Latest

सोलापूर : जमिनीच्या हव्यासापोटी तीन पुतण्यांनी केला काकाचा खून

रणजित गायकवाड

फोडशिरस (ता. माळशिरस) येथे सामाईक पडवस्ती जमिनीच्या हव्यासापोटी तीन पुतन्यानी स्वत:च्या काकाचा खून केल्याचे प्रकरण समोर आले आहे. नाना अप्पा वाघमोडे (वय ७०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी की, फोंडशिरस येथील मयत नाना आप्पा वाघमोडे आपल्या भावांसह ३३ गुठे सामाईक जागेत राहत होते. प्रत्येकी १८ गुंठे जमीन वस्तीपड म्हणून मिळाले होते. या वस्तीपड जमिनीवरून नाना वाघमोडे यांचे पुतणे धर्मेंद्र महादेव वाघमोडे, अंकुश महादेव वाघमोडे, किरण महादेव वाघमोडे हे आपल्या काकांशी नेहमी भांडण करत होते. तसेच जीवे मारण्याचीही धमकी पुतण्यांनी काकाला दिली होती.

मंगळवार (दि. १९) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास संशयीत आरोपी व मयताचा मुलगा बाबुराव वाघमोडे यांचे भांडण झाले होते. त्यानंतर दुपारी साडेचार वाजता मयताचे नातू तुषार आणि नाना वाघमोडे हे घराच्या मागून शेळ्या घेऊन येत असताना किरण, अंकुश, धर्मेंद्र या तिघा पुतण्यांनी मिळून काका नाना वाघमोडे यांना लोखंडी पाईपच्या साह्याने मारहाण केली. यावेळी डोक्यावर जबर मार बसल्याने काका नाना वाघमोडे गंभीर जखमी झाले.

जखमी नाना वाघमोडे यांना नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी अकलुज क्रिटीकेअर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेतील आरोपी किरण महादेव वाघमोडे यास फलटण येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेचा पुढील तपास नातेपुते पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी करीत आहेत.

SCROLL FOR NEXT