Latest

शाळेत जाण्यासाठी त्यांना काढावी लागते वाहत्या नदीतून वाट !

अमृता चौगुले

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : सीना नदी वाहती असल्याने मठपिंप्री (ता. नगर ) येथील नदी पलिकडील नागरिकांचा गावाशी संपर्क तुटत आहे. गाव आणि वाडी, वस्त्यांच्या मधून सीना नदी जात असून, या ठिकाणी पूल उभारण्याची गेल्या 20 वर्षांपासून ग्रामस्थ मागणी करत आहेत. नदीवर पूल नसल्याने शाळकरी मुलांना शिक्षणासाठी गावात येण्यासाठी पाण्यातून वाट शोधावी लागते. नदीला पाणी जास्त असल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होत असून, मुलांचा पाण्यातील जीवघेणा प्रवास थांबविण्यासाठी पूल उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नगर तालुक्यातील मठपिंप्री येथील फलके वस्ती, दोबोले वस्ती, कदमवस्ती दरम्यान पाच सहाशे लोकसंख्या आहे.

गाव आणि वाडीच्यामधून सीना नदी असल्याने पावसाळ्यात तर या वस्त्यांवरील नागरिकांचा गावाशी असलेला संपर्क तुटत आहे. पाणी जास्त असल्यास वाडी, वस्तीवरील नागरिकांना दैनंदिन गरजेसाठी आष्टी तालुक्यातील कोयाळ, पिंपळा या गावांवर अवलंबुन राहावे लागते. सीना नदीवर पूल उभारण्याची मागणी 20 वर्षांपासूनची आहे. मात्र, नेत्यांकडून आश्वासना शिवाय गावकर्‍यांच्या पदरात काहीच पडत नाही. फलके वस्ती, दोबोले या लोकवस्तीची भागा नदी पलिकडे वास्तव्यास आहे. मठपिंप्री गावातून सुंबेवाडी, पिंपळा, कोयळ, सांगवी आष्टीला जोडणारा रस्ता वाडीवस्त्यांवरून जात आहे. परंतु सीना नदीवर पूल नसल्याने या ठिकाणीची रहदारी नदीला पाणी असल्याने ठप्प होते.

पूलाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी ग्रामस्थांकडून लोकप्रतिनिधींकडे मागणी होत आहे. परंतु, लोकप्रतिनिधी फक्त वेळ मारून नेत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायतमार्फत ठराव, पूल मागणीचा पत्रव्यवहार, असे लोकशाही मार्गाने पाठपूरावा केला; परंतु पूलाच्या प्रश्नाची दखल ना प्रशासन घेतली ना लोकप्रतिनिधीनी.

सीना नदी वाहती असल्याने अडचण
सीना नदी वाहती असल्याने पात्र ओलांडून शाळकरी मुले, आजारी रुग्ण, गरोदर महिला वयोवृद्ध नागरिकांना पूल नसल्याने गावात जाण्यासाठी पाण्यातूनच वाट शोधावी लागत आहे. नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. पूलाचा प्रश्न मार्गी लागावा अशी अपेक्षा ग्रामस्थ करत आहे.

नदीला पाच -सहा महिने पाणी असते, या कालावधीत शाळकरी मुले, वृद्ध, गरोदर माता, एखादा अंत्यविधी अशा गोष्टींसाठी मठपिंप्री गावातील पाचशे लोकवस्ती असलेले या नागरीकांना नदीवर पूल नसल्याने असाह्य वेदना सहन कराव्या लागतात. याला जबाबदार या भागाचे लोकप्रतिनिधी व प्रशासन आहे. पाठपुरावा करूननही स्थिती तशीच आहे.
                                                                  – शरद नवसुपे, उपसरपंच, मठपिंप्री 

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT