Latest

नाशिकच्या पालकमंत्री पदाचा कोणताही वाद नाही : दादा भुसे

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे मी मार्गदर्शन घेत असतो. नाशिकच्या पालकमंत्री पदाचा कोणताही वाद नाही. तसेच राज्याच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे आहेत. त्यांनी राबवलेल्या योजनांमुळे जनतेस फायदा होत असल्याचा दावा, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केला.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत भुसे बाेलत होते. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अजित दादा जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर भुसे म्हणाले की, एकनाथ शिंदे हेच राज्यातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे जनतेला त्याचा आर्थिक लाभ होत आहे. तसेच नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत त्यांनी सांगितले की, पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतात. त्यामुळे त्यांनी दिलेला निर्णय स्विकारण्याची जबाबदारी आमची असल्याचे भुसे यांनी सांगितले. लोकसभा निवडणूक संदर्भात भाजपकडून सुरू असलेल्या तयारीवर त्यांनी सांगितले की, प्रत्येक पक्षाला निवडणूकीची पुर्व तयारी करण्याचा अधिकार आहे. राज्यात सर्वाधिक खासदार व आमदार हे महायुतीचे निवडून येतील असा दावाही भुसेंनी केला. दरम्यान, गणेशाेत्सवात डीजे आणि लेझर मुळे झालेल्या दुष्परिणामांबाबत त्यांनी सांगितले की, संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच डीजे आणि लेझरमुळे आरोग्य समस्या होत असतील तर सर्व राजकीय पक्षांसह संघटनांनी मिळून डीजे आणि लेझर बंदी बाबत निर्णय घ्यायला हवा अशी भूमिका पालकमंत्री दादा भुसे यांनी मांडली.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT