Latest

ज्या मूल्यांसाठी काम केले ती मूल्य पक्षात राहिलीच नाहीत; काँग्रेस नेते सीआर केसवन

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: मी गेल्या 22 वर्षांपासून काँग्रेस पक्षाचा सदस्य आहे, परंतु दुर्दैवाने इतका काळ गेल्यानंतर मला असे वाटते की, सध्या काँग्रेस पक्षाची वृत्ती, दृष्टीकोन रचनात्मक किंवा ठोस राहिलेला नाही. मी ज्या मूल्यांसाठी पक्षात काम करत होतो, त्यामध्ये प्रचंड बदल झाला आहे. सध्या पक्षात ती मूल्यच राहिली नसल्याचे देशाचे पहिले गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांचे नातू आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सीआर केसवन यांनी स्पष्ट केले आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर देखील काँग्रेसमध्ये ज्येष्ठ, प्रमुख नेत्यांची गळती सुरूच आहे. त्यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. सध्या देशाचे पहिले गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांचे नातू आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सीआर केसवन यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. सीआर केसवन यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठवला असल्याचे त्यांनी स्वत: ट्विट करून सांगितले. यानंतर त्यांनी पहिल्यांदाच एएनआय या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, पुढे बोलताना ते म्हणाले, मी पक्ष सोडल्यानंतर काँग्रेसबद्दल काही भाष्य करावे असे मला वाटत नाही. काँग्रेस पक्षात ज्याप्रकारे राजकारण केले जात आहे ते मला पटत नाही, त्यामुळे या क्षणाला पक्ष सोडणेच योग्य आहे आणि आज मी तेच केले असेही सीआर केसवन यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते वेळी स्पष्ट केले आहे.

काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सर्जिकल स्ट्राईकच्या पुराव्याची मागणी केली, हे निराशाजनक आहे. माझी राजकारण करण्याची पद्धत पक्षाशी सुसंगत नाही हे माझ्या लक्षात आले आहे. मला वाटले की मी आता इथला नाही, त्यामुळे मी 'भारत जोडो यात्रे'मध्येही सहभागी झालो नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT