Latest

कामाची बातमी ! फार्मासिस्टने सुट्या गोळ्या देणे बंधनकारक

अमृता चौगुले
पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिवदर्शन चौकामधील एका मेडिकल स्टोअरमध्ये एका व्यक्तीने डॉक्टरांची चिठ्ठी दाखवून दोन प्रकारच्या प्रत्येकी चार गोळ्या मागितल्या. मात्र, औषध विक्रेत्याने सुट्या गोळ्या देण्यास नकार दिला. 'तुम्हाला पूर्ण स्ट्रिप खरेदी करावी लागेल,' असे सांगितले. मात्र, अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमानुसार डॉक्टरांनी लिहून दिलेल्या प्रमाणात फार्मासिस्टने औषध देणे बंधनकारक केले आहे. दर वर्षी 25 सप्टेंबर हा जागतिक फार्मासिस्ट दिवस म्हणून साजरा केला जातो. आरोग्यसेवेच्या क्षेत्रामध्ये औषध विक्रेता हा डॉक्टर आणि रुग्णांमधील दुवा मानला जातो. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील कायद्याचे पालन करणे औषध विक्रेत्यांना बंधनकारक आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोणतेही औषध देऊ नये आणि चिठ्ठीत लिहिलेल्या प्रमाणात रुग्णांना औषधे उपलब्ध करून द्यावीत, याकडे पुणे जिल्हा फार्मासिस्ट असोसिएशनने लक्ष वेधले आहे.
रुग्णाला तपासल्यावर त्याची लक्षणे, आजाराची तीव्रता पाहून डॉक्टर किती औषधांचा डोस द्यायचा, याचा निर्णय घेतात. दोन प्रकारच्या गोळ्या तीन दिवसांसाठी घेण्याचा सल्ला प्रीस्क्रिप्शनमध्ये लिहून देतात. डॉक्टरांची चिठ्ठी घेऊन मेडिकल स्टोअरमध्ये गेल्यावर काही विक्रेत्यांकडून स्ट्रिप कापून गोळ्या देण्यास नकार दिला जातो. याबाबत ग्राहक न्यायालयाकडे तक्रार नोंदवू शकतात.
डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे देण्यास मनाई
ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, मासिक पाळीतील पोटदुखी, अशा तक्रारींसाठी बहुतांश वेळा रुग्ण मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन नेहमी उपयोगी पडणार्‍या गोळ्यांची मागणी करतात. एखादा डोस घेऊन बरे वाटत असल्याने दोन-तीन गोळ्या मागितल्या जातात. मात्र, काही फार्मासिस्ट सुट्या गोळ्या देणे नाकारतात. 'गोळ्यांची पूर्ण स्ट्रिप खरेदी करावी लागेल, आम्हाला स्ट्रिपमधील दोन-तीन गोळ्या देता येत नाहीत,' अशी कारणे सांगतात. मुळात कायमचूर्ण, झंडू बाम अशी काही 'ओव्हर द काउंटर' औषधे वगळता इतर औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देण्यास कायद्याने बंदी आहे.
डॉक्टरांनी चिठ्ठीत लिहिलेल्या प्रमाणातच गोळ्या देणे औषध विक्रेत्यांना बंधनकारक आहे. अपुरा किंवा जास्तीचा डोस दिल्यास रुग्णाला त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे बीपी, डायबेटीसच्या एक-दोन गोळ्या हव्या असल्यास त्या उपलब्ध करून द्याव्यात. अँटिबायोटिक औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय देऊ नयेत.
                                                     – अनिल बेलकर, सचिव, पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशन 
हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT