नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : नारायणगाव टोमॅटो मार्केटमध्ये सध्या आवक घटली असून, आज सुमारे 6 हजार क्रेटची आवक झाली. तथापि, 20 किलोच्या क्रेटला बाजारभाव अवघा 50 ते 120 रुपये मिळाला. म्हणजेच एका किलोला अवघा अडीच ते सहा रुपये किलो याप्रमाणे मिळाला. नारायणगाव टोमॅटो मार्केट आजूबाजूच्या तालुक्यात व जिल्ह्यात प्रसिद्ध असल्याने बीड, पारनेर, बारामती आदी ठिकाणांहून टोमॅटो येथे विक्रीला येतात. मागील आठवड्यात पाऊस पडल्याने टोमॅटो खराब झाले. डाग पडले तसेच मागणी घटल्याने बाजार पडले असल्याचे व्यापारी सांगत आहेत. यंदाचा टोमॅटो हंगाम संपत आल्यामुळे बाहेरचे दिल्ली, आग्रा, इंदूर, भोपाळ येथील व्यापारी निघून गेले आहेत. सध्या टोमॅटो खरेदीला स्थानिक व्यापारी आहेत.
संबंधित बातम्या :
मागणी नाही व पावसाने टोमॅटो खराब झाल्यामुळे बाजार पडले, असे व्यापारी सांगत असले तरी बळीराजा मात्र चिंता व्यक्त करीत आहे. लाखो रुपये खर्च करून हे पीक करायचे आणि बाजारभाव जर मिळाला नाही, तर शेतकर्याने काय करायचं?, पोरंबाळं कशी जगवायची?, कुटुंब कसं चालवायचं? असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे. टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळावा यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे