Latest

कोल्हापूर : लोंढा नाला प्रकल्प भरला; प्रकल्प आजही बेवारस स्थितीत

अनुराधा कोरवी

धामोड : पुढारी वृत्तसेवा : केळोशी बुद्रुक (ता. राधानगरी) येथील लोंढा नाला प्रकल्प आज रविवारी (दि.२३) रोजी पहाटे सहा वाजता पुर्ण क्षमतेने भरला. राधानगरी तालुक्यातील हा दुसरा लघु पाटबंधारे प्रकल्प भरल्यामुळे तुळशी धरण भरण्याचा मार्ग सुखकर झाला. यामुळे केळोशी व धामोड परिसरातील शेतकऱ्यातुन समाधान व्यक्त होत आहे. मात्र, हा प्रकल्प पुर्ण होऊन १० वर्षे उलटली असली तरीही हा प्रकल्प बेवारस स्थितीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

केळोशी बुद्रक येथील लोंढा प्रकल्पाची ५६०३. २२५ सहस्त्र घनमीटर पाणि साठवण क्षमतेच्या प्रकल्पाचे काम २०१२ साली पुर्ण झाले. या प्रकल्पामुळे केळोशी बु ॥, कुंभारवाडी, सुतारवाडी, पिलावरेवाडी, देऊळवाडी, वळवंटवाडी, खामकरवाडी, अवचितवाडी आदी गावांच्या सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

२०१२ साली बांधण्यात आलेला हा प्रकल्प पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरीत न झाल्यामुळे या प्रकल्पाचा ताबा आजही संबंधित ठेकेदाराकडे असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकल्पाचे दगडी पिचिंगचे (अश्मपटल) काम अपुरे असून अतिवृष्टी काळात येथे अचानक पावसाचा जोर वाढला आणि पाणी पातळी वाढली तर प्रकल्पाला धोका निर्माण होऊ शकतो. याची पाटबंधारे विभाग व आपत्कालीन पुर नियंत्रण कक्षाला पुसटसी कल्पना किंवा फिकीर नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

संबंधित ठेकेदार व पाटबंधारे विभागाने पुर परिस्थितीत या प्रकल्पाची काळजी घेणे गरजेचे असताना हा प्रकल्प बेवारस स्थितीत आहे. याबाबत तुळशीच्या शाखा अभियंता कारेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा प्रकल्प आपल्या अखत्यारीत येत नसल्याची माहीती दिली आहे.

२०१२ साली या प्रकल्पाच्या सांडव्याचे काम अपुरे असताना हा प्रकल्प भरला होता. व प्रकल्प कोणत्याही क्षणी फुटणार अशी परिरथीती निर्माण झाली होती. तेव्हा संबंधित ठेकेदाराने एका रात्रीत सांडव्याची खुदाई केली होती. त्यानंतर तेथे कोणतेही काम करण्यात आलेले नाही. सद्या बेवारस स्थितीत असलेल्या प्रकल्पाची आपत्कालीन परिस्थितीत देखभाल करण्यासाठी पाटबंधारे विभागाने एखाद्या कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी केळोशी बु ॥ व धामोड परिसरातील नागरीकांतून व्यक्त होत आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT