Satwik-Chirag : ‘कोरिया ओपन’वर सात्विक-चिराग जोडीची मोहोर | पुढारी

Satwik-Chirag : ‘कोरिया ओपन’वर सात्विक-चिराग जोडीची मोहोर

पुढारी ऑनलाईन डेस्क : Satwik-Chirag : भारतीय बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने कोरिया ओपनचे विजेतेपद पटकावून इतिहास रचला. पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारतीय जोडीने अप्रतिम कामगिरी केली आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या इंडोनेशियच्या फजर अल्फियान आणि मोहम्मद रियान या जोडीला 17-21, 21-13, 21-14 अशा फरकाने पराभवाची धुळ चारली.

भारताच्या सात्विक-चिराग या जोडीने यंदाचे तिसरे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. या जोडीने यापूर्वीच इंडोनेशिया सुपर 1000 आणि स्विस ओपन सुपर 500 विजेतेपद जिंकले आहे. रविवारी कोरिया ओपनच्या अंतिम सामन्यात त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. पहिला गेम 21-17 असा गमावल्यानंतर भारतीय बॅडमिंटनपटूंनी जोरदार पुनरागमन करत संपूर्ण सामनाच बदलून टाकला आणि पुढचे दोन गेम जिंकून सामना खिशात घातला.

तत्पूर्वी, भारतीय जोडीने शनिवारी उपांत्य फेरीत लिआंग वेई केंग आणि वांग चांग या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाच्या चिनी जोडीचा पराभव करून अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. त्यानंतर रविवारी पहिल्या क्रमांकाच्या जोडीला पराभूत करत जेतेपद पटकावले. भारतीय जोडी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

कोरिया ओपन जिंकणारी पहिली भारतीय जोडी

कोरिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा 1991 मध्ये प्रथमच आयोजित करण्यात आली होती. तेव्हापासून दरवर्षी दक्षिण कोरियातील वेगळ्या शहरात ही स्पर्धा आयोजित केली जाते. ही एक ग्रेड-2 स्पर्धा आहे, जी बॅडमिंटन सुपर-500 श्रेणी अंतर्गत येते. यामध्ये पुरुष, महिला आणि मिश्र दुहेरीसह पुरूष, महिला एकेरी गटाच्या 5 स्पर्धा होतात.

2017 मध्ये पीव्ही सिंधूने कोरिया ओपनच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले होते. कोरिया ओपनचे विजेतेपद जिंकणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली होती. त्या नंतर आता पुरुष दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी 2023 चे विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे. दुहेरी स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारी ही पहिली भारतीय जोडी ठरली.

Back to top button