दौंड तालुक्यातील श्री रासाईदेवीचे मंदिर ठरतेय सेल्फी पॉइंट | पुढारी

दौंड तालुक्यातील श्री रासाईदेवीचे मंदिर ठरतेय सेल्फी पॉइंट

नानगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : नानगाव (ता. दौंड) येथील भीमा नदीच्या मधोमध श्री रासाईदेवीमातेचे एक नयनरम्य टुमदार व नक्षीदार मंदिर आहे. नदीतील हे मंदिर पुलावरून ये-जा करणार्‍या प्रवाशांचे मन वेधून घेत आहे. प्रवासी या ठिकाणी थांबून देवीचे दर्शन व एक सेल्फी घेतात. त्यामुळे हे ठिकाण आता सेल्फी पॉइंट ठरत आहे.

येथील भीमा नदीत रासाईदेवीचे मंदिर आहे, तर वडगाव रासाई व नानगाव या गावांना जोडणारा भीमा नदीवर पूल आहे. या पुलावरून मोठ्या प्रमाणावर छोट्या-मोठ्या वाहनांची सतत वर्दळ असते. पुलावरून प्रवास करताना भीमा नदीचे काठोकाठ भरून वाहणारे पाणी आणि या पाण्यात असलेले मंदिर पाहिल्यावर वाहनचालक व प्रवासी या पुलावर थांबतात.

पुलावर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असते. आकाशात ढगाळ वातावरण नसते तेव्हा सूर्यास्त पाहण्यासाठीदेखील नागरिक पुलावर थांबतात. एकीकडे नदीपात्रातील मंदिर, तर दुसरीकडे खळखळ वाहणारे नदीतील पाणी तसेच ऐनवेळचा सूर्यास्त हे दृश्य खूपच मनमोहक व नयनरम्य असते. त्यामुळे या ठिकाणी थांबून एक सेल्फी घेण्याचा मोह मात्र कोणालाच आवरत नाही.

Back to top button