Latest

‘२०१९ च्या राष्ट्रपती राजवटीची आयडिया शरद पवारांनीच दिली’

मोहन कारंडे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदल होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच निवडणुका लढविल्या जातील. सहा महिन्यांत कोणत्याही गोष्टी बदलत नाहीत. अजित पवारांना जेव्हा मुख्यमंत्री बनवायचे असेल, तेव्हा त्यांना पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू, संधी मिळेल तेव्हा त्यांना मुख्यमंत्री करू, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नेतृत्व बदलावरील चर्चेला पूर्णविराम दिला.

संबंधित बातम्या : 

दरम्यान, वाहिनीच्या या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी शरद पवारांबाबतही गौप्यस्फोट केले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची सूचना शरद पवार यांनीच केली होती. त्यांच्याच सूचनेनुसार राष्ट्रपती राजवट लावण्यात आल्याचेही फडणवीस म्हणाले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. मात्र, शिवसेनेच्या भूमिकेमुळे सत्तेवर कोण येणार, असा प्रश्न निर्माण झाला. यावेळी शरद पवार यांनी भाजपशी संपर्क साधला आणि राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपने युती करावी, असे सुचवले. त्यासाठी राज्यात काही काळासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी सूचनाही त्यांनी केली होती जेणेकरून राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांना भाजपशी युती करण्याबाबत माहिती मिळू शकेल. मात्र, सर्व वाटाघाटी झाल्यानंतर शरद पवार यांनी माघार घेतली, असा दावाही फडणवीस यांनी केला.

ताकद वाढवण्यासाठी अजित पवारांना सोबत घेतले

दरम्यान, शिंदे फडणवीस सरकारकडे पुरेसे संख्याबळ असताना अजित पवारांना सोबत घेण्याबाबतच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले की, एखादा राजकीय पक्ष तुमच्याबरोबर येऊ इच्छित असेल, तर त्यांना युतीत न घेणे, हा योग्य निर्णय असू शकत नाही.. राजकारणात नेहमीच आपली ताकद संघटित करावी लागते, वाढवावी लागते.

आज 'इंडिया' आघाडीकडून देशभरातील विरोधी पक्षांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्हाला मोदी नको, एवढे एकच लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. अशावेळी अजित पवार आमच्याबरोबर येऊ इच्छित असतील आणि त्यांची राजकीय ताकदही आहे, त्यामुळे आम्ही त्यांना बरोबर घेतले. एकनाथ शिंदे आमच्याबरोबर आल्याने आमचे सरकार बनले होते, हे खरे आहे. सरकार चांगल्याप्रकारे चालतही होते. आम्हाला काहीच समस्या नव्हती; पण तुमची ताकद आणखी वाढणार असेल, तर त्याला नाकारले जाऊ शकत नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT