सरकार फोडा-फोडी करेल, पण तुम्ही एकजुट रहा : जरांगे-पाटील यांची लातूर सभेत भावनिक साद | पुढारी

सरकार फोडा-फोडी करेल, पण तुम्ही एकजुट रहा : जरांगे-पाटील यांची लातूर सभेत भावनिक साद

लातूर; पुढारी वृत्तसेवा : मी तुमचा अन तुम्ही माझे आहात. समाजच माझा मायबाप आहे अन माय बापाशी गद्दारी करणे माझ्या रक्तात नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मी ही ओळख जपेन. आणखी काय सांगू? माझ्यावर विश्वास ठेवा. आरक्षणाची लढाई आता निर्णयाप्रत येवून पोहचली आहे. फुट नको एकजूट कायम ठेवा. आरक्षण मिळवीणारच… अशी भावनिक साद मराठा आरक्षणाचा लक्षवेधी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी (दि.४) लातूर येथील सकल मराठा बांधवाना घातली अन हात उंचावून बांधवांनीही त्यास होकार भरला. जरांगे पाटील यांच्या मराठा गाठी-भेटी दौऱ्याअंतर्गत झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या  कार्यक्रमासाठी समाजबांधवांचा जनसागर लोटला होता. या जरांगे पाटील म्हणाले की, आरक्षणाशिवाय मराठा समाजाच्या लेकरांची होणारी परवड थांबावी अन त्यांचे जगणे सुसह्य व्हावे म्हणून आम्ही आंतरवली सराटीत लोकशाही मार्गाने उपोषण करीत होतो. सुखाचा दिवस आपल्या लेकराबाळांच्या जीवनात येईल याच प्रामाणिक अपेक्षेने मायबहिणीही आपली चिल-पिल घेऊन त्यात सामिल झाल्या होत्या. कसलाही अपराध नसताना लाठ्या काठ्या घालून त्यांना रक्तबंबाळ करण्यात आले. अनेक तरुणांच्या शरीरात गोळ्या घुसल्या आजही ते बिचारे उपचाराखाली आहेत. या हल्ल्याने आमचे अवसान गळेल असे सरकारला अन यंत्रणेला वाटले असेल परंतु आमच्यात हिंम्मत आली अन मी माझ्या उपोषणाची धार अधिक तीव्र केली.

सरकार फोडा फोडीचे प्रयत्न करु शकते

शेवटी सरकारला आमच्यापर्यंत यावे लागले. फोडा फोडीचे सर्व प्रकार आजमावण्यात आले. कानात बोला कोपऱ्यात चला असा आर्जव केला परंतु मी माझी निष्ठा सोडली नाही. ४० दिवसाचा अल्टीमेटम दिला आहे. आता केवळ २० दिवस राहीलेत. यादरम्यान सरकारकडून फोडा फोडीचा प्रयत्न होवू शकतो. दोन गट पाडले जावू शकतात परंतु तसे होवू देवू नका. कोणी तसे केलेच तर त्याच्यापर्यंत जा, प्रसंगी त्यांचे पाय धरा अन त्यांना समाजाच्या भल्यासाठी तरी असे करु नका अशी विनंती करा असे पाटील म्हणाले.

लातुरकांरांनी १४ नोव्हेंबरच्या सभेस यावे

५० टक्क्यांच्या आत मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून आरक्षण द्या किंवा लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा समाजाचा स्वतंत्र प्रवर्ग करुन तेही आरक्षण ५० टक्क्यांच्या आत द्या असे पर्यायही जरांगे पाटील यावेळी सरकारला दिले. १४ नोव्हेंबरला दीडशे एकरात आंतरवाली सराटीत होणाऱ्या मराठा आरक्षण सभेस लातुर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी स्वयंसेवक म्हणून यावे अशी साद त्यांनी घातली. मराठा आरक्षणासाठी उपोषण केलेल्या सहा जणांचा जरांगे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रदीप सोळंके यांनीही सभेसाठी येण्याचे आवाहन केले.

हिंम्मत धरण्याऐवजी युवक मरणाला कवटाळत आहेत

आम्ही तुमच्या जीवनात समाधानाचा दिवस जागावा म्हणून आरक्षणाची लढाई लढत आहोत अन अशावेळी हिंम्मत धरण्याऐवजी अनेक युवक मरणाला कवटाळत आहेत. तुम्हीच नसाल तर हे आरक्षण मिळवून काय करायचे? असा सवाल करीत जीवन संपवू नका असे आवाहन जरांगे पाटील यांनी यावेळी तमाम तरुणाईस केले.

Back to top button