Latest

PM Narendra Modi : भारताची ओळख असलेले ‘गुरुकुल’ म्हणजे ‘गुरूचे अन् ज्ञानाचे कुळ’ – पीएम मोदी

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असताना श्री स्वामीनारायण गुरुकुल राजकोट संस्थानच्या वाटचालीला आज ७५ वर्षे पूर्ण होत आहेत, हा सुवर्णयोग आहे. ज्या काळात जगातील इतर देश त्यांची राज्ये आणि राजघराण्यांद्वारे ओळखले जात होते, त्या काळात भारताची ओळख भारतभूमीच्या गुरुकुलांनी केली होती. गुरुकुल म्हणजे गुरूचे अन् ज्ञानाचे कुळ असल्याचेही मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. श्री स्वामीनारायण गुरुकुल राजकोट संस्थानच्या 75 व्या अमृत महोत्सवाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना ते बोलत होते.

या कार्यक्रमावेळी बोलताना पीएम मोदी म्हणाले, गेल्या 75 वर्षात गुरुकुलने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चांगल्या विचार, संस्कारांनी त्यांचे मन आणि अंतःकरण जपले आहे. नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठे भारतीय शिक्षण व्यवस्थेसाठी मार्गदर्शक दिवे आहेत. भारताची जी सांस्कृतिक समृद्धी आज आपण पाहत आहोत, ते विद्यापीठांचेच योगदान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्राचीन परंपरेला आधुनिक भारतापर्यंत नेण्यासाठी स्वामीनारायण गुरुकुल 'कन्या गुरुकुल' सुरू करून यामध्ये आणखी एक इतिहास रचत आहे. याचा मला आनंद आहे, यासाठी मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो, असेही पीएम मोदी म्हणाले.

शैक्षणिक पायाभूत सुविधा असो, की शैक्षणिक धोरणावर आम्ही पूर्वीपेक्षा अधिक वेगाने काम करत आहोत. शिवाय यापुढेही आम्ही अशी शैक्षणिक प्रणाली बनवत आहोत, जी भविष्यात दिसून येईल. आज आयआयटी आणि एम्स सारख्या उच्च शैक्षणिक संस्थांची संख्या देखील अनेक पटींनी वाढली आहे. २०१४ पासून देशातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या संख्येत 65 टक्के वाढ झाली आहे, असेही ते म्हणाले.

आज भारत डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, 'एक भारत श्रेष्ठ भारत', व्होकल फॉर लोकल अशा भव्य कार्यक्रमांच्या माध्यमातून पुढे झेप घेत आहे. सर्वसमावेशक पद्धतीने केलेले सामूहिक प्रयत्न नक्कीच प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणतील, असे देखील पीएम मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT