Latest

प्रजासत्ताकदिनी भन्नाट भाषण करणाऱ्या ‘भोऱ्या’ला मुख्यमंत्री भेटणार

मोहन कारंडे

जालना, पुढारी वृत्तसेवा : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शाळेत भाषण करताना कार्तिक ऊर्फ भोर्‍याने लोकशाहीची व्याख्या सांगून प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने राज्यभर त्याच्या भाषणाची चर्चा झाली. आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वाटूर (ता. परतूर) येथे होणाऱ्या कार्यक्रमाला त्याला निमंत्रण दिले आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील अनेक नेते त्याची भेट घेणार आहेत.

अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारा कार्तिक उर्फ भोर्‍या जालिंदर वजीर याने प्रजासत्ताक दिनी केलेले भाषण सोशल मिडियावर खूप व्हायरल झाले. पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या भोऱ्याने देशातील लोकशाही आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत सांगितल्यानंतर त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव झाला. लोकशाहीवरील त्याच्या विनोदी भाषणाचा व्हिडीओ राम भोंडवे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्याचे भाषण पाहिले. त्यानंतर थेट मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक यांनी व्हिडीओ कॉलद्वारे त्याच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्री यांनी भोर्‍या व त्याचे वडील यांना 2 फेब्रुवारी रोजी वाटूर फाटा येथे भेटायला येण्याचे निमंत्रण दिले आहे. गरीब शेतकरी कुटुंबातील जालिंदर वजीर यांना दोन मुले व एक मुलगी आहे. कार्तिक हा घरातील सर्वांचा लाडका आहे. त्याच्या या भाषणामुळे तो राज्यभर प्रसिध्द झाला आहे.

आमदार राजेश टोपे यांच्याकडून शुभेच्छा

घनसावंगी मतदारसंघाचे आमदार राजेश टोपे यांनी 'हेच तर माझ्या मतदारसंघातील टॅलेंट' असे ट्विट करीत शुभेच्छा दिल्या आहेत. 'कार्तिक हा अत्यंत खोडकर आणि उत्साही मुलगा आहे. त्याच्या भाषणातून त्याला लोकशाहीची असलेली पुसटशी का होइना; पण जाणीव दिसून येते. कार्तिकला सर्व जण भोर्‍या या टोपण नावाने हाक मारतात. या भोर्‍याला माझ्याकडून शुभेच्छा' असे ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे.

कार्तिक हा घरातील सर्वाचा लाडका आहे. त्याला डोळ्याचा आजार असून त्याला लांबचे दिसत नाही. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने कार्तिकच्या डोळ्यावर उपचार करणे शक्य झाले नाही. 26 जानेवारीला केलेल्या भाषणाचा आम्हाला अभिमान आहे. त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने दररोज राज्यभरातून फोन येतात.

-जालिंदर वजीर, (कार्तिक उर्फ भोर्‍याचे वडील)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT