सत्ताधार्‍यांच्या नजरेकडे पाहून काम करण्याची पध्दत चिंताजनक : जयंत पाटील | पुढारी

सत्ताधार्‍यांच्या नजरेकडे पाहून काम करण्याची पध्दत चिंताजनक : जयंत पाटील

उस्मानाबाद, पुढारी वृत्तसेवा :  हल्‍ली सत्ताधार्‍यांच्या नजरेकडे पाहून काम करणार्‍यांची संख्या वाढली आहे. त्यामुळेच सत्ताधारीही  आम्ही ठरवू तसेच सभागृह चालेल, या भूमिकेपर्यंत आले आहेत. ही पध्दत लोकशाहीसाठी चिंताजनक आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सत्ताधार्‍यांवर टीका केली. भाई उध्दवराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज (दि.३१) आयोजित जीवनगौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. शहरातील छत्रपती शिवाजी विद्यालयात हा कार्यक्रम झाला. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विचारमंचचे अध्यक्ष धनंजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आ. पाटील म्हणाले, की सत्तेसाठी मोठी आमिषे दाखवून आमदार फोडण्याचे प्रकार चिंताजनक आहेत. त्यामुळेच समाजातील शेवटचा घटक व राज्यघटनेच्या रक्षणासाठी युवा पिढीने दक्ष राहण्याची गरज आहे. आपल्या भोवती, समाजात, देशात, राज्यात काय घडत आहे यावर लक्ष ठेवून त्याचे आकलन करणे आवश्यक आहे.”

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या जनतेच्या मनातील प्रतिमांना तडा देण्याचे षड्यंत्र सुरु आहे, आरोपही त्‍यांनी केला. लोककल्याणासाठी उभी हयात खर्ची घातलेल्या या थोर नेत्यांच्या प्रतीमा दूर सारुन दुसर्‍याच प्रतिमा तिथे उभा करण्याचा प्रयत्न दिसतो आहे. तो समजून घेऊन तरुणांनी त्यांना आपल्या विचाराने, कृतीतून विरोध केला पाहिजे, असेही ते म्‍हणाले. यावेळी आ. विक्रम काळे, एसटीचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button