Latest

ठाणे : बदलापुरात जुन्या गाड्यांच्या शोरूमला आग; १२ गाड्या जळून खाक

निलेश पोतदार

बदलापूर ; पुढारी वृत्‍तसेवा  अंबरनाथ बदलापूर रोडवरील कार्मेल शाळेच्या पुढे ऑटोक्राफ्ट या नव्या जुन्या गाड्यांची खरेदी विक्री आणि दुरुस्तीचे शोरूम आहे. या शोरूमला आज (बुधवार) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत तेथे असलेल्या बारा गाड्या जळून खाक झाल्या. तर या गाड्यांमध्ये असलेल्‍या सीएनजीच्या टाक्‍यांचाही स्फोट झाला. सिलींडर टाक्‍यांच्या स्फोटामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली. या आगीमुळे या गॅरेजच्या जवळून जाणारी हाय टेन्शन लाईन जळून खाली पडली. यामुळे बदलापूर पूर्व भागाचा वीज पुरवठा खंडित झाला.

कुळगांव बदलापूर आणि अंबरनाथ अग्निशमन दलाचे प्रमुख भागवत सोनोने हे आपल्या मुलीला सकाळी जवळच कार्मेल शाळेत सोडण्यासाठी गेले असताना त्यांना हा प्रकार समजला. त्यांनी तातडीने अग्निशमन बदलापूर आणि अंबरनाथ एमआयडीसी अग्निशमन दलाला पाचारण करून या आगीवर नियंत्रण आणले. या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी एक तासाहून अधिक वेळ प्रयत्‍न सुरू होते. त्यामुळे अंबरनाथ बदलापूर या रस्त्यावर एक मार्ग एक साठी रहदारीसाठी बंद करण्यात आला होता.

बदलापूर शहरात अनेक अनधिकृत पद्धतीने गॅरेजेस आणि शोरूम थाटण्यात आली आहेत. या ठिकाणी अग्नि सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेण्यात येत नाही. त्यामुळे या आगीच्या घटना घडत आहेत. तसेच रस्त्यांवर गाड्यांचे पार्किंग केले जाते. त्‍यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी रस्त्यावरील वाहनांचे पार्किंगसोबतच अनधिकृत गॅरेज आणि शोरूमवर पालिकेने धडक कारवाई करण्याची स्‍थानिकांतून मागणी होत आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT