Latest

हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरू; जवान मोठ्या संख्येने पूंछमध्ये दाखल

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : पूंछ जिल्ह्यातील सुरनकोट भागात शनिवारी संध्याकाळी हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात (J&K Terror Attack) जखमी झालेल्या पाच जवानांपैकी एकाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी ताफ्यातील दोन वाहनांपैकी एका वाहनाला लक्ष्य केले आणि अंदाधुंद गोळीबार केला होता. लष्कराने दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम तीव्र केली असून अतिरिक्त लष्करी जवान पुंछमधील जर्रा वाली गली (JWG) येथे पोहोचले आहेत. या पार्श्वभूमीवर पूंछ जिल्ह्यात लष्कराच्या जवानांकडून कडक सुरक्षा तपासणी सुरू आहे.

या हल्ल्याचा (J&K Terror Attack) एक फोटो समोर आला असून त्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनांवर कसा अंदाधुंद गोळीबार केला हे दिसत आहे. लष्कराच्या ताफ्यात समाविष्ट असलेल्या ट्रकच्या विंडस्क्रीनवर गोळ्यांच्या खुणा दिसत आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एके असॉल्ट रायफल्सने सज्ज असलेले दहशतवादी जवळच्या जंगलात पळून गेले आहेत.

  • गेल्या ३० महिन्यात पूंछमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची ही सहावी घटना आहे.
  • २०२१ पासून सुरू झालेल्या घटनांमध्ये आतापर्यंत २१ जवानांचा बळी गेला आहे.
  • डिसेंबरपासून पुंछमधील तिन्ही हल्ल्यांची मोडस ऑपरेंडी सारखीच आहे.
  • दहशतवाद्यांकडून संध्याकाळच्या वेळी लष्कराच्या वाहनांवर हल्ले केले जातात.

शोध मोहीम सुरू

स्थानिक राष्ट्रीय रायफल्स (RR) युनिटने परिसरात मोठ्या प्रमाणावर शोध आणि घेराबंदी सुरू केली आहे. आजही येथून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची सुरक्षा दलांकडून झडती घेतली जात आहे. संशयास्पद लोकांच्या हालचालीची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर लष्कराची वाहने पूंछ शहरात सुरक्षितपणे पोहोचली आहेत.

दहशतवादी हल्लात एक जवान शहीद

दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या भारतीय हवाई दलाच्या पाच जवानांपैकी एक जवान शहीद झाला. तर अन्य चार जण जखमी आहेत. आणखी एका जवानाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हवाई दलाच्या प्रवक्त्यांनी ट्विटरवर सांगितले की, दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत हवाई दलाचे पाच जवान जखमी झाले आहेत. स्थानिक लष्करी तुकड्यांकडून परिसराला घेराव घालून शोधमोहीम राबवली जात आहे.

पूंछमध्ये या वर्षातील दुसरा दहशतवादी हल्ला

पुंछमध्ये लष्कराच्या ताफ्यावर या वर्षातील हा दुसरा हल्ला (J&K Terror Attack) आहे आणि गेल्या डिसेंबरनंतरचा तिसरा हल्ला आहे. यापूर्वी १२ जानेवारी रोजी कृष्णा घाटी भागात दहशतवाद्यांनी लष्करी वाहनांना लक्ष्य केले होते, ज्यात चार जवान शहीद झाले होते. त्याआधी २२ डिसेंबर २०२३ रोजी डेरा की गली भागात लष्कराच्या वाहनांवर हल्ला झाला होता. आता हा तिसरा हल्ला आहे. या तीन हल्ल्यांमध्ये पाच जवान शहीद झाले, तर अनेक जवान जखमी झाले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.