Latest

Revanth Reddy : आमदारकीचे तिकीट नाकारलं त्‍याच रेवंत यांनी ‘केसीआर’ यांना सत्तेतून पायउतार केलं

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बदल हा जगण्‍याचा नियमच. मात्र राजकारणातील बदलाची प्रक्रिया काहीशी संथ मानली जाते. या बदलाची सुरुवात ही सत्तेच्‍या पहिल्‍या दिवसापासूनच होते, असेही म्‍हणतात. म्‍हणजे जो नेता सत्ता काबीज करतो त्‍या दिवसांपासून त्‍याच्‍या सत्तेतील पायउताराचा दिवसही ठरलेला असतो. असाच आजचा दिवस तेलंगणाचे सर्वेसर्वा अशा भ्रमात राहिलेल्‍या के. चंद्रशेखर राव यांच्‍यासाठी ठरला आहे. तेलंगणामध्‍ये यंदाची विधानसभा निवडणूक ही के चंद्रशेखर राव विरुद्ध काँग्रेस, अशी नाही तर के.चंद्रशेखर राव विरुद्ध रेवंत रेड्डी अशी रंगली होती. आजच्‍या निकालात राज्‍यात काँग्रेसने निर्णायक आघाडी घेतली आहे. जाणून घेवूया तेलंगणामध्‍ये के. चंद्रशेखर राव यांना सत्तेतून पायउतार करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष रेवंत रेड्डी (Revanth Reddy) यांच्‍या राजकीय कारकीर्दीविषयी….

Revanth Reddy : …आणि रेवंत रेड्डी तेलंगणा राष्‍ट्र समितीतून बाहेर पडले

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत मुख्‍यमंत्री के.चंद्रशेखर राव यांना आव्‍हान देणारे रेवंत रेड्डी यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली. यानंतर त्‍यांनी के.चंद्रशेखर राव यांच्‍या तेलंगणा राष्‍ट्र समितीमध्‍ये प्रवेश केला होता. २००४ मध्ये कलवाकुर्ती विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्‍याची इच्‍छा त्यांनी व्‍यक्‍त केली; परंतु त्यांना तिकीट नाकारले गेले. कारण या निवडणुकीत तेलंगणा राष्‍ट्र समितीची काँग्रेससोबत आघाडी होती. जागा वाटपाच्या सूत्रानुसार हा मतदारसंघ काँग्रेसकडे देण्‍यात आला होता. तिकिट नाकारल्‍याने रेवंत रेड्डी तेलंगणा राष्‍ट्र समितीमधून बाहेर पडले.

जिल्‍हा परिषदेची निवडणूक अपक्ष म्‍हणून लढवली, अवघ्‍या २० मतांनी जिंकली!

2006 मध्ये रेवंत रेड्डी यांनी अपक्ष म्हणून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. त्यांची लढत प्रबळ प्रतिस्पर्धी संकीरेड्डी जगदीश्वर रेड्डी यांच्याशी  होती. ही निवडणूक त्‍यांनी  २० पेक्षा कमी मतांनी जिंकली होती.

तेलगु देसम पार्टीला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्‍ये प्रवेश

तेलंगणा राष्‍ट्र समितीमधून बाहेर पडल्यानंतर रेवंत रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू यांच्‍या तेलगू देसम पार्टीत प्रवेश केला. २००९ आणि २०१४ मध्‍ये त्‍यांनी कोडंगल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली. २०१५ मध्‍ये कॅश फॉर व्होट घोटाळ्यात त्‍यांना अटकही झाली होती. एमएलसी निवडणुकीत आपल्या मतांवर प्रभाव टाकण्यासाठी नामनिर्देशित आमदाराला लाच दिल्याचा आरोप त्‍यांच्‍यावर होता. स्‍वंतत्र राज्‍य निर्मितीनंतर तेलंगणात तेलगू देसम पार्टीचा प्रभाव कमी होत गेला. यानंतर रेवंत यांनी ऑक्टो‍बर २०१७ मध्‍ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Revanth Reddy: अल्‍पवधीत काँग्रेसच्‍या प्रदेशाध्‍यक्षपदी झेप

अल्‍पवधीतच रेवंत यांचा काँग्रेसमधील वाढत्या प्रभावाची के. चंद्रशेखर राव यांना जाणीव झाली. त्‍यामुळे २०१८ मध्‍ये कोडंगल विधानसभा निवडणूकीत त्‍यांचा पराभव करण्‍यासाठी राव यांनी आपले सर्वस्‍व पणाला लावले होते. त्‍यांनी केलेल्‍या प्रयत्‍नामुळेच रेवंत यांना मागील विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. यानंतर रेवंत यांनी २०१९ मध्‍ये मलकाजगिरी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. ते खासदार झाले. यानंतर तेलंगणा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने त्‍यांना प्रदेशाध्‍यक्षपदी नियुक्‍त केले. यंदाच्‍या निवडणुकीत ते काँग्रेसचे स्टार प्रचारक असल्याने त्‍यांनी कोडंगल आणि कामारेड्डी या मतदारसंघामधील प्रचाराची जबाबदारी आपल्‍या दोन भावांवर सोपवली होती.

Revanth Reddy : उत्‍कृष्‍ट 'कथाकार' असणारे काँग्रेसचे स्‍टार प्रचारक

प्रभावी वक्तृत्त्व हे रेवंत रेड्‍डी यांच्‍या राजकारणातील प्रभावाचे प्रमुख वैशिष्‍ट्य आहे. तेलंगणामधील काँग्रेसचे नेते मणिकम टागोर हे रेवंत यांना उत्‍कृष्‍ट कथाकार, असे संबोधतात. मतदारांशी थेट संवाद साधण्‍याच्या हातोटीमुळे यंदाच्‍या विधानसभा निवडणुकीत त्‍यांच्‍या सभांना उस्‍त्‍फूर्त प्रतिसाद मिळला. रेवंत या निवडणुकीत तेलंगणा काँग्रेसमधील सर्व मतदारसंघांत सर्वाधिक मागणी असलेला स्‍टार प्रचारक बनले. काँग्रेसच्‍या विजयात जेवढा के. चंद्रशेखर राव यांच्‍या नाकर्तेपणाच्‍या कारभाराचा वाटा आहे तेवढचा रेवतं यांच्‍या प्रभावी भाषणाची छाप पडल्‍याचे मानले जाते.

के चंद्रशेखर राव विरुद्ध रेवंत रेड्डी

प्रदेशाध्‍यक्षपदाच्‍या धुरा संभाळल्‍यानंतर रेवंत यांनी के. चंद्रशेखर राव यांच्‍यावर हल्‍लाबोल सुरु केला. तेलंगणा राज्‍य निर्मितीचे संपूर्ण श्रेय काँग्रेसच्‍या नेत्‍या सोनिया गांधी यांना जाते. त्‍यांनी आंध्र प्रदेशमधील सत्ता सोडत तेलंगणा राज्‍याची निर्मिती केली, असे प्रचार करत त्‍यांनी के. चंद्रशेखर राव यांचे महत्त्‍व कमी करण्‍याचा प्रयत्‍न केला. ३ डिसेंबरला ( तेलंगणा विधानसभा निवडणूक निकालाचा दिवस ) के. चंद्रशेखर राव राजकारणातून निवृत्त होतील. राज्‍यातील विविध भ्रष्‍टाचार प्रकरणी यापुढे त्‍यांचा मुक्‍काम चेर्लापल्‍ली कारागृहात असेल, असा दावा रेवंत रेड्डी यांनी केला. त्‍यांचा हा दावा आता खरा ठरणार का? याकडे राज्‍यातील जनतेचे लक्ष वेधले आहे.

रेवंत यांनी राजकीय अस्‍तित्‍वाची लढाई जिंकली

तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा के चंद्रशेखर राव विरुद्ध काँग्रेस असा नाही तर के चंद्रशेखर राव विरुद्ध रेवंत रेड्डी असा रंगला होता. रेवंत यांच्‍या राजकीय अस्‍तित्‍वाची लढाई होती. कारण पक्षांतर्गत ज्‍येष्‍ठ नेत्‍यांच्या नाराजीला सामोरे जात त्‍यांना के. चंद्रशेखर राव यांच्‍या सारख्‍या राज्‍यातील मातब्‍बर नेत्‍यांचाही सामना करावा लागला होता. या राजकीय संघर्षात अखेर रेवंत यांनी बाजी मारली आहे. आजच्‍या निकालानंतर तेलंगणातील राजकीय वर्तुळात चर्चा असेल ती, "मोका सभी को मिलता हे जनाब!" याचीच…


हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.