Latest

Team India : टीम इंडियाचा विश्वविक्रम, 50वा टी-20 सामना जिंकून रचला इतिहास

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाने (team india) बुधवारी न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना 168 धावांनी जिंकला. हा भारताचा टी-20 फॉरमॅटमधील सर्वात मोठा विजय ठरला. त्याचबरोबर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली संघाने सलग चौथी तर एकूण सलग 8 वी टी-20 मालिका जिंकली. याचबरोबर भारतीय संघाने मागील 12 मालिकांपासून अपराजित राहण्याची घोडदौड कायम ठेवली आहे. याशिवाय टीम इंडियाने एक विश्वविक्रम नोंदवला आहे. याआधी जगातील कोणत्याही संघाला अशी कामगिरी करता आलेली नाही.

टीम इंडियाने (team india) बुधवारी घरच्या मैदानावर 50 वा टी-20 सामना जिंकला. जगातील कोणत्याही संघाला अशी कामगिरी करता आलेली नाही. भारताने आपल्या 78 व्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात हा विक्रम नोंदवला. विशेष म्हणजे हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली भारताच्या युवा संघाने हे यश मिळवून दिले. टीम इंडियाने घरच्या मैदानावर 26 सामने गमावले आहेत तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. त्याचवेळी विदेशी भूमीवर भारताने 69 पैकी 42 सामने जिंकले असून 23 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. तर तीन सामने बरोबरीत सुटले आहेत आणि एक सामना रद्द झाला आहे.

एकंदरीत, टीम इंडियाने (team india) आतापर्यंत 198 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यापैकी 126 जिंकले आहेत आणि 63 गमावले आहेत. याशिवाय चार सामने टाय झाले असून पाच सामन्यांचा निकाल लागलेला नाही. ही आकडेवारी 2006 पासून आतापर्यंतची आहे, जेव्हा भारताने वीरेंद्र सेहवागच्या नेतृत्वाखाली पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. या प्रकरणात टीम इंडियाच्या आसपास कोणताही संघ नाही. टीम इंडिया सध्या वनडे तसेच टी-20 मध्ये नंबर 1 संघ आहे.

पाकिस्तानचा विक्रम मोडीत

न्यूझीलंडविरुद्धचा शेवटचा टी-20 सामना 168 धावांनी जिंकून भारताने सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. प्रथम खेळताना हार्दिक ब्रिगेडने न्यूझीलंडला 235 धावांचे लक्ष्य दिले, प्रत्युत्तरात किवी संघ अवघ्या 66 धावांवर गारद झाला. न्यूझीलंडची टी-20 मधील ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या ठरली. यापूर्वी 29 जून 2018 रोजी भारताने आयर्लंडचा 143 धावांनी पराभव केला होता. धावांच्या बाबतीत भारताचा हा विजय टी-20 जगातील दुसरा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी 2007 मध्ये श्रीलंकेने केनियाचा 172 धावांनी पराभव केला होता. त्याचबरोबर टीम इंडियाने पाकिस्तानचा (2022) हाँगकाँगवर 155 धावांच्या विजयाचा विक्रमही मोडीत काढला.

टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वात मोठे विजय (धावांच्या बाबतीत)

  • 2007 मध्ये श्रीलंकेने केनियाचा 172 धावांनी पराभव केला
  • भारताने 2023 मध्ये न्यूझीलंडचा 168 धावांनी धुळ चारली
  • पाकिस्तानने 2022 मध्ये हाँगकाँगवर 155 धावांनी मात केली
SCROLL FOR NEXT