Latest

india tour south africa : टीम इंडियाचा द. आफ्रिका दौरा एक आठवडा लांबणीवर जाण्याची शक्यता

रणजित गायकवाड

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : india tour south africa : न्यूझीलंड संघाविरुद्ध सुरू असलेली कसोटी मालिका संपल्यानंतर भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जायचे आहे. पण दौरा सुरू होण्यापूर्वीच त्यावर कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचे सावट आहे. खरं तर, सध्या आफ्रिकन देशांमध्ये ओमायक्रॉनचा संसर्ग वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांचे क्रिकेट बोर्ड चिंतेत आहेत. दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या बातमीनुसार, येत्या रविवारपर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) भारतीय संघाला आफ्रिकेच्या दौऱ्यावर जायचे की नाही याचा निर्णय घेणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, BCCI हा दौरा आठवडाभर पुढे ढकलू शकते. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. भारताला आफ्रिकेत (india tour south africa) ३ कसोटी, ३ वनडे आणि ४ टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे टीम इंडियाचा संघ ९ डिसेंबरला आफ्रिकेसाठी उड्डाण घेणार आहे. पण, सध्याच्या परिस्थितीवरून पुढे काय होईल याबाबत अद्याप अस्पष्टता आहे.

दक्षिण आफ्रिकेत कोरोना संसर्गाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. येथे सापडलेला कोरोनाचा नवीन प्रकार ओमायक्रॉन जगातील २४ देशांमध्ये पोहोचला आहे. अनेक देशांनी आफ्रिकन देशांतून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घातली आहे.

सरकारच्या मंजुरीची बीसीसीआयला प्रतिक्षा… (india tour south africa)

बीसीसीआयच्या सूत्राने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, आम्ही मालिका एका आठवड्याने पुढे ढकलण्याचा विचार करत आहोत. याचे कारण कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटशी संबंधित धोका हा आहे. खेळाडूंची सुरक्षा आणि आरोग्य हे आमचे प्राधान्य आहे. आम्ही सध्या केंद्र सरकारच्या परवानगीची वाट पाहत आहोत. याबाबत आम्ही दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाशी सतत चर्चा करत आहोत. बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ निवडही स्थगित ठेवल्याचे त्यांनी सांगितले.

काय म्हणाला विराट कोहली?

भारताचा कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी सांगितले की, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी प्रत्येकजण कठोर परिश्रम घेत आहे. परंतु संघाचे लक्ष शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीवर आहे. तो पुढे म्हणाला, 'आम्ही बीसीसीआयशी याबाबत चर्चा करत आहोत. आम्हाला खात्री आहे की एक-दोन दिवसात किंवा लवकरच सर्वकाही स्पष्ट होईल.'

बीसीसीआयने सरकारशी चर्चा करावी : क्रीडा मंत्री

बीसीसीआयने संघ पाठवण्यापूर्वी केंद्र सरकारशी चर्चा करावी, असे क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले होते. केवळ बीसीसीआयच नाही तर सर्व बोर्डांनी आपला संघ धोका असलेल्या देशात पाठवण्यापूर्वी सरकारशी चर्चा करावी, असेही त्यांनी सांगितले होते.

३ कसोटी सामन्यांऐवजी २ कसोटी सामने होऊ शकतात

सूत्रांच्या माहितीनुसार, ३ कसोटींऐवजी २ कसोटींचाही विचार केला जाऊ शकतो, जेणेकरून टीम इंडियाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी थोडा वेळ मिळू शकेल. कोरोनाचा नवा व्हेरिएंटच्या संसर्गाचा वेग पाहता, बीसीसीआय आणि सीएसएने म्हटले आहे की, खेळाडूंच्या बायोबबलचे कठोरपणे अंमलबजावणी होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT