Latest

The Kerala Story मुस्‍लिमांविरोधात नव्‍हे तर दहशतवादाविरोधात : दिग्दर्शक, निर्मात्‍यांनी केले चित्रपटाचे समर्थन

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : The Kerala Story या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि नव्‍या वादाला तोंड फुटले आहे. ५ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून,  यापूर्वी केरळमधील राजकारण तापले आहे.  सत्ताधारी डाव्‍या पक्षासह काँग्रेसकडून या चित्रपटाला तीव्र विरोध केला आहे. राज्‍यात या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, अशी मागणी या दोन्‍ही राजकीय पक्षांनी केली आहे. दरम्‍यान, द केरळ स्‍टोरीच्‍या दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेत्‍यांनी चित्रपटाचे समर्थन केले आहे. हा चित्रपट मुस्‍लिमांविरोधात नव्‍हे तर दहशतवादाविरोधात असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले आहे.

'इंडिया टुडे'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत द केरळ स्‍टोरी चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन म्हणाले, "मी अनेक महिन्यांच्या संशोधनानंतर हा चित्रपट बनवला आहे. पीडितांशी बोलल्यानंतर त्‍यांच्‍या वेदनांनी मी दहारलो होते. या वेदना जनतेसमोर याव्‍यात असे माझे प्रामाणिक मत होते तर चित्रपटाचे निर्माते विपुल शाह म्हणाले, " या चित्रपटात केरळ राज्याविरोधात काहीही नाही. चित्रपटात मुस्लिमांना नव्हे तर दहशतवाद्यांना लक्ष्य केले आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी चित्रपट पाहावा अशी इच्छा आहे."

The Kerala Story : मुख्‍यमंत्री विजयन यांनी केला लव्‍ह जिहादचा मुद्दा उपस्थित

हा चित्रपट लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित करतो. तसेच केरळ राज्याला धार्मिक अतिरेकी केंद्र म्हणून दाखवण्याचा राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ परिवाराचा प्रयत्‍न आहे, असा आरोप केरळचे मुख्‍यमंत्री पिनराई विजयन यांनी रविवार ३० एप्रिल रोजी केला होता.
द केरळ स्‍टोरी या चित्रपटात दक्षिणेकडील राज्यात कथितपणे बेपत्ता झालेल्या सुमारे ३२ हजार महिलांची गोष्‍ट चित्रित केली आहे. संबंधित महिलांनी धर्मांतर केले, कट्टरपंथी बनले आणि भारत आणि जगातील दहशतवादी मोहिमांमध्ये त्यांना तैनात केले गेले, अशी या चित्रपटाची कथा आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी दावा केला आहे की, मुख्‍यमंत्री विजयन यांच्या मतदारसंघात शूटिंग करत असताना चित्रपटाच्या क्रूवर हल्ला करण्यात आला होता. तसेच अभिनेत्री अदा शर्माला चित्रपटात काम करत असताना अनेक धमकीचे संदेशही आले होते.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्‍या नावाखाली हा चित्रपट समाजात विष पसरवत आहे. तसा परवाना त्‍यांना देता येणार नाही, असे केरळमधील सत्ताधारी सीपीआय(एम) आणि विरोधी काँग्रेसने म्‍हटले होते., प्रथम चित्रपट पाहा यानंतर निष्कर्ष काढा, असे आवाहन दिग्‍गदशंक सुदीप्तो सेन यांनी यावेळी केले होते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT