मुंबई, पुढारी वृत्तसेवा: जिंदाल पॉलिफिल्म प्रा. लि. कंपनीतील दुर्घटनेप्रकरणी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत आज (दि.१) सभागृहाचे लक्ष वेधले. या कंपनीतील दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी तेथील अग्निशमन यंत्रणा ही या घटनेच्या आधीपासूनच बंद होती. प्लँटमधून थर्मिक फ्लूईड ऑईलची गळती होऊन अनेक कामगार जखमी झाले, अशी माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात दिली.
अशा घटना टाळण्यासाठी व घटना घडल्यावर कारवाई व्हावी, यासाठी जो विभाग काम करतो, तो म्हणजे औद्योगिक सुरक्षा व कामगार विभागांतर्गत येणारा डिश विभाग. मात्र हा विभागच अकार्यक्षम असल्याचा मुद्दा दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला.
या घटनेला कंपनी जबाबदार असतानाही पोलिसांना कारवाई करता येत नाही. सरकारी अधिकाऱ्यांना दुर्घटना झाल्यावर प्रवेश नाकारला जातो, अशाप्रकारे कंपन्यांची दादागिरी बंद झाली पाहिजे. या प्रकरणात ३ जणांचा मृत्यू, तर २० जण जखमी झाले आहेत. त्यामुळे या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या कंपनीवर सरकार काय कारवाई करणार ? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.
हेही वाचा