ॲडलेड : पुढारी ऑनलाईन; T20 World Cup च्या सेमीफायनल सामन्याच्या अवघ्या ४८ तास आधी भारताला धक्का बसला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याला ॲडलेडमध्ये सराव सत्रादरम्यान दुखापत झाली आहे. एका वृत्तानुसार, रोहित शर्माच्या उजव्या हाताला नेटमध्ये सराव करताना मार लागला आहे.
टीम इंडियाने टी-२० वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेतील सुपर-१२ मधील ग्रुप २ मध्ये शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेला पराभूत करून स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताबरोबरच न्यूझीलंड, इंग्लंड व पाकिस्तान यांनीही अंतिम चारमध्ये प्रवेश केला. पहिला सेमीफायनल सिडनीत न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात बुधवारी (९ नोव्हेंबर) तर दुसरा सेमीफायनल भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात अॅडलेड येथे गुरुवारी (१० नोव्हेंबर) होणार आहे. यापूर्वीच्या आकडेवारीवरून सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचेच पारडे जड असल्याचे स्पष्ट होते. पण त्याआधी रोहितला दुखापत झाली आहे.
नेटमध्ये सराव करताना रोहित भारतीय संघाचा साइडआर्म थ्रोअर एस रघूकडून थ्रोडाउन घेत होता. तेव्हा चेंडू त्याच्या उजव्या हातावर आदळला. यामुळे त्याला तीव्र वेदना झाल्या. त्यानंतर तो लगेच नेटमधून बाहेर पडला. दरम्यान, काही वेळानंतर रोहित शर्मा फलंदाजीच्या सरावासाठी नेटमध्ये पुन्हा परतला.
सध्या सुरू असलेल्या T20 World Cup मध्ये रोहित त्याच्या फॉर्मशी झगडत आहे. त्याने स्पर्धेतील पाच सामन्यांमध्ये केवळ ८९ धावा केल्या आहेत. नेदरलँड्सविरुद्ध सर्वाधिक ५३ धावांची खेळी त्याने केली होती. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. T20 वर्ल्डकपमध्ये त्याने सर्वाधिक २४६ धावा केल्या आहेत. तर सूर्यकुमार यादवने जवळपास २०० च्या स्ट्राइक रेटने २२५ धावा केल्या आहेत.
हे ही वाचा :