मेलबर्न; वृत्तसंस्था : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ टी-20 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पोहोचला असला तरी माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी टीम इंडियाला एक गंभीर इशारा दिला आहे. भारतीय संघाकडून होत असलेली एक चूक त्यांनी निदर्शनास आणून दिली आहे. राहुलबरोबरच अन्य खेळाडूंनीही जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याचे गावसकर यांनी सांगितले.
गावसकर म्हणाले की, सूर्याकुमार सध्या अत्यंत चांगल्या फॉर्मात आहे. तो संघाला भक्कम स्थिती प्राप्त करून देत आहे. भारताने झिबाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यात सूर्याकडून नाबाद 61 धावा झाल्या नसत्या तर भारतीय संघ 150 धावांपर्यंतही पोहोचू शकला नसता.
सूर्यकुमार अपयशी ठरला तर भारताला 140-150 धावा करण्यासाठी देखील संघर्ष करावा लागेल. एकीकडे कर्णधार रोहित शर्मा फॉर्मसाठी संघर्ष करताना दिसत आहे आणि त्याने पाच सामन्यांत अवघ्या 89 धावा केल्या आहेत. त्यामुळे राहुलसह अन्य खेळाडूंनीही अधिक जबाबदारी घेणे आवश्यक आहे. भारतीय संघाने लवकरात लवकर सुधारायला हवे. जर त्यांनी चूक सुधारली नाही तर त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते, असेही गावसकर यांनी सांगितले.