पुढारी ऑनलाईन डेस्क : अफगानिस्तानचा संघ टी-२० विश्वचषकात चांगली कामगिरी करू शकलेला नाही. सेमीफायनलमध्येही जागा पक्की करण्यास अफगानिस्तानच्या संघाला अपयश आले. शुक्रवारी (दि.४) झालेल्या अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अफगानिस्तानचा ४ धावांनी पराभव केला. या पराभवानंतर अफगानिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. मोहम्मद नबीने ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली. (T-20 World Cup)
मोहम्मद नबी या ट्वीटमध्ये म्हणाला, "आमचा टी-२० विश्वचषकातील प्रवास संपण्याच्या वाटेवर आहे. चाहत्यांच्या आणि आमच्या आशा होत्या, तेवढे यश आम्हाला मिळवता नाही आले. आमच्या या कामगिरीने आम्ही निराश झालो आहोत. गेल्या वर्षभरापासून एखाद्या कर्णधाराला आवश्यक वाटते त्याप्रमाणे संघाने टी-२० विश्वचषकासाठी तयारी केली नाही." (T-20 World Cup)
पुढे नबी म्हणाला, गेल्या काही दौऱ्यांपासून निवड समिती आणि संघ व्यवस्थापनामध्ये एकमत नव्हते. यामुळे संघाचे संतुलन बिघडले. यामुळे मी कर्णधारपदाचा राजीनामा देत आहे. मात्र, आपल्या देशासाठी खेळणे सुरूच ठेवणार आहे. मी सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो, कारण पाऊस सुरू असूनही आम्हाला समर्थन देण्यासाठी उपस्थित राहिलात. तुमचे हे प्रेम आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. (T-20 World Cup)