पुढारी ऑनलाईन डेस्क : अयोध्येत आज (दि.१७) दुपारी १२ वाजता रामलल्लाचा सूर्यतिलक सोहळा पार पडला. अभिजित मुहूर्तावर सुर्यकिरणांनी रामलल्लाच्या कपाळाला स्पर्श केला. भक्ती आणि विज्ञानाचा अद्भुत संगम आज जगाने भक्तिभावाने पाहिला. वाल्मीकी रामायणाप्रमाणे त्रेतायुगात याचवेळी व मुहूर्तावर प्रभू श्रीरामाचा जन्म झाला होता.
अयोध्येतील सूर्यतिलकप्रसंगी नऊ शुभ योगासह तीन ग्रहांची स्थिती त्रेतायुगात होती, तशीच यावेळीही होती. दुपारी १२ वाजता सूर्यतिलक झाला. तेव्हा केदार, गजकेसरी, पारिजात, अमला, शुभ, वाशी, सरल, काहल आणि रवियोग घडले. या नऊ शुभ योगांत रामलल्लांचा सूर्यतिलक झाला. रामजन्मप्रसंगी सूर्य आणि शुक्र आपल्या उच्च राशीत होते; तर चंद्र स्वतःच्या राशीत उपस्थित होता. या वर्षीही योगायोगाने असेच घडत आहे. ग्रहांची ही दशा देशासाठी शुभ संकेत आहे, असे ज्योतिष तज्ज्ञांचे मत आहे.
सूर्यतिलक समारंभ आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने झाला. शिखरावर रिफ्लेक्टर यंत्रणा बसविण्यात आली होती त्याद्वारे सूर्याच्या किरणांनी प्रवास केला व गर्भगृहात रामलल्लाच्या कपाळावर पडलीत. दुपारी १२.०१ वाजता सूर्याची किरणे रामलल्लाच्या चेहऱ्यावर पडली. कपाळावर सुमारे ७५ मिमीचा टिळक लावण्यात आला होता. सूर्यतिलक स्पष्टपणे दिसावा व रामलल्लालाही उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून कपाळावर चंदनाचा लेप लावण्यात आसा होता. हा भक्ती आणि विज्ञानाचा अद्भुत संगम रामभक्त भक्तिभावाने पाहत राहिले.
पाच मिनिटे राहिला तिलक
या सूर्यतिलक सोहळ्याची शास्त्रज्ञांनी अनेक महिने तयारी केली होती. यासाठी अनेक चाचण्या घेण्यात आल्या होत्या. शास्त्रज्ञांनी अयोध्येत आकाशातील सुर्याच्या हालचालीचा अभ्यास केला होता. नेमकी दिशा निश्चित केल्यानंतर मंदिराच्या वरच्या मजल्यावर रिफ्लेक्टर आणि लेन्स बसवण्यात आल्या. सूर्यकिरणे फिरून रामलल्लाच्या कपाळावर पोहोचली. सूर्याची किरणे वरच्या भिंगावर पडली. त्यानंतर, ती तीन लेन्समधून गेली आणि दुसऱ्या मजल्यावरील आरशात आली. शेवटी सूर्याची किरणे ७५ मिमीच्या आकारात राम लल्लाच्या कपाळावर चमकत राहिली. दुपारी १२.०१ वाजताच सूर्याची किरणे थेट रामाच्या चेहऱ्यावर पोहोचली. १२.०१ ते १२.०६ पर्यंत सूर्याभिषेक चालू होता. हे सुमारे पाच मिनिटे सुरू होते.
रामनवमीनिमित्ता रामलल्लांना पिवळा-गुलाबी रंगाचा स्वर्णजडित पोशाख परिधान केला आहे. सोन्याच्या धाग्यांनी या पोशाखावर नक्षीकाम करण्यात आलेले आहे.
हेही वाचा :