नाशिक (सुरगाणा) : प्रशांत हिरे
उन्हामुळे तालुक्यातील जलस्रोत आटले असून, आदिवासी पाड्यांवरील महिलांना पाण्याच्या शोधार्थ अक्षरश: रात्र-रात्रभर भटकंती करावी लागत असल्याची बाब समोर आली आहे. हंडाभर पाणी आणण्यासाठी अनवाणी पायांनी काट्याकुट्याची वाट तुडवत टेंभे वा बॅटरीच्या उजेडात झरे शोधण्याची जीवघेणी कसरत येथील महिलांना करावी लागत आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यामधील हे भीषण वास्तव समाजमनाला अस्वस्थ करणारे असले, तरी प्रशासन यंत्रणा मात्र अद्यापही ढिम्म असल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील मोरडा या गावासह आजूबाजूच्या गळवड, शिरीषपाडा, दांडीची बारी, म्हैसमाळ, देवळा, धुरापाडा, खुंटविहीर, मोहपाडा आदी अनेक गावे व पाड्यांवर सध्या तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. या गावांतील मुली-महिलांना डोक्यावर, कमरेवर हंडा व हातात बॅटरी घेऊन रात्रंदिवस पाण्याचा शोध घ्यावा लागत आहे. मोरडा गावातील विहिरीने तळ गाठला आहे. तास-तास घालवल्यानंतर तेथे एखादा हंडा भरतो. त्यामुळे आदिवासी पाड्यांवरील महिलांना डोंगरदर्यांची, काट्याकुट्यांची वाट तुडवत अनवाणीच पाणी शोधत फिरावे लागत आहे. हिंस्र पशूंची भीती असल्याने गावातील तरुण टेंभे वा मोबाइल फ्लॅश लावून उजेड निर्माण करतात.
या भटकंतीत एखादा झरा सापडल्यास तिथून मिळेल तसे पाणी भरून घ्यावे लागते. अनेकदा हे पाणी गढूळ असते. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. परिसरातील बहुतांश झर्यांवर रात्रभर महिलांची रांग असते. लग्न करून गावात सून म्हणून आलेल्या नवविवाहितेला चुडा उतरण्याच्या आधी डोक्यावर हंडा घेऊन भटकंती करण्याची वेळ येते. दिवसभर काबाडकष्ट आणि रात्रभर पाण्यासाठी जागरण, अशी दुर्दैवी स्थिती आदिवासी महिलांची झाली आहे. परिसरातील मुकी जनावरेही या पाणीटंचाईला बळी पडत आहेत.