शिराळा : पुढारी वृत्तसेवा
नेर्ले (ता. वाळवा) येथे पुणे – बेंगलोर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्याचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री ही घटना घडली. याबाबत कासेगाव पोलिसांनी शिराळा वनविभागास माहिती दिली.
त्यानंतर वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वनपाल सुरेश चरापले, वनरक्षक अमोल साठे, वनकर्मचारी बाबासाहेब गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. मृत बिबट्या मादी असून अडीच ते तीन वर्षाचा आहे. इस्लामपूर येथील वनविभागाच्या कार्यालयात सहाय्यक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, मानद वन्यजीव रक्षक डॉ. अजितकुमार पाटील यांच्या उपस्थितीत डॉ. अंबादास माडकर यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर बिबट्याचे दहन करण्यात आले. रात्रीच्या वेळेस महामार्गावर वाहनांच्या धडकेत बिबट्यांचा मृत्यू होण्याची ही जिल्ह्यातील चौथी घटना आहे.