Latest

सोनाली फोगाट यांच्या खुनाशी संबंधित गोव्यातील कर्लिस रेस्टॉरंट पाडण्यास SC ची स्थगिती

दीपक दि. भांदिगरे

पणजी : ज्या बार आणि रेस्टॉरंटमध्ये अभिनेत्री आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचा मृत्यू (Sonali Phogat's death) झाला. त्या गोव्यातील हणजूण येथील कर्लिस बार रेस्टॉरंटचे बेकायदेशीर बांधकाम आज पोलीस बंदोबस्तात पाडले जात होते. दरम्यान सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) या कर्लिस बार आणि रेस्टॉरंटचे (Curlies restaurant) बांधकाम पाडण्यास स्थगिती दिली आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा व्यवसाय चालणार नाही या अटीवर बांधकाम पाडण्यास स्थगिती दिली आहे.

हरियाणा भाजपच्या नेत्या व टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांच्या खुनानंतर हणजूण येथील कर्लिस बार पुन्हा चर्चेत आला होता. समुद्र किनार्‍यावर सीआरझेड (कोस्टल रेग्युलेशन झोन) तीन मधील 'नो-डेव्हलपमेंट झोन' मध्ये बेकायदेशीरपणे या बारचे बांधकाम केले आहे. त्यामुळे हा बार पाडण्याचा आदेश जीसीझेडएमएने (गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अ‍ॅथॉरिटी) दिला होता. हा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) कायम ठेवला. त्यामुळे या बारवर हातोडा पडणार हे जवळपास निश्‍चित झाले होते.

कर्लिस बार पाडण्याचे आदेश जीसीझेडएमएने दिले होते. या आदेशा विरोधात कर्लिसचे मालक लिनेट यांनी हरित लवादाकडे दाद मागितली होती. मात्र, गुरुवारी 8 रोजी राष्ट्रीय हरित लवादाने जीसीझेडएमएचा आदेश कायम ठेवला. आम्हाला अपीलामध्ये कोणतीही योग्यता आढळली नाही. त्यामुळे आदेशात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण नाही, असे राष्ट्रीय हरित लवादाने निवाड्यात म्हटले आहे. आता सापडलेल्या संरचना त्याच आहेत, ज्या 1991 पूर्वी अस्तित्वात होत्या, ज्यांच्या संदर्भात पंचायतीने ना हरकत दिली होती किंवा घर कराच्या पावत्या दिल्या. याचे उत्तर 'नाही' असे आहे. सध्याच्या संरचनेचे स्वरूप कायमस्वरूपी बांधकाम आहे. मूळ बांधकाम तात्पुरत्या स्वरुपाचे होते. सदर शॅकमधील काही संरचना अपीलकर्त्याच्या मालकीची असल्या तरी अनेक संरचना अपीलकर्त्याच्या मालकीच्या नाहीत, हे स्पष्ट झाल्याचेही एनजीटीने म्हटले आहे. कोणत्याही विकास विभागात आवश्यक परवानगीशिवाय, व्यावसायिक कारणांसाठी मूळ बांधकामाच्या जागी नवीन बांधकाम उभे केले गेले आहे, असेही एनजीटीने म्हटले आहे.

सांगवान व सिंग यांची कोठडी वाढली

सोनाली फोगाट खून प्रकरणातील मुख्य संशयीत सुधीर सांगवान व सुखविंदर सिंग यांच्या कोठडीत गुरुवारी जेएमएफसी म्हापसाने आणखी दोन दिवसांची वाढ केली. दोघांना गुरुवारी हणजून पोलिसांनी म्हापसा येथील न्यायालयात हजर केले होते. गोवा पोलिसांना हरियाणा तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे सांगवान आणि सिंग यांची अधिक चौकशी करण्यासाठी व नवीन पुरावे गोळा करण्यासाठी पोलिस कोठडी गरजेची असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले होते. सुधीर सांगवान याने मालमत्तेसाठी सोनाली फोगाट यांची पेयातून ड्रग्ज देऊन हत्या केल्याची कबुली यापूर्वीच दिली आहे.

नाईट क्‍लब बंद करण्याचे आदेश

पर्यावरण आणि वन, भारत सरकार आणि जीसीझेडएमएने एडविन नुनीस आणि लिनेट नुनीसद्वारे चालवल्या जाणार्‍या या शॅकमधील नाइट क्लब, बार आणि रेस्टॉरंटच्या स्वरूपात सर्व व्यवसाय बंद करण्याचे निर्देश एनजीटीने दिले आहेत.

परवाने मागे घेण्याचे आदेश

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्‍तांनी कर्लिस नाईट क्लब, बार आणि रेस्टॉरंटमधील मद्यविक्री आणि सेवनासाठी एडविन नुनीस आणि लिनेट नुनीस यांना दिलेला अबकारी परवाना 30 दिवसांच्या आत मागे घेण्याचे निर्देश एनजीटीने दिले आहेत. तसेच मुख्य वीज अभियंत्यांना येथील यांना वीज खंडित करण्याचे निर्देश दिले आहेत. हणजूण ग्रामपंचायतीने व्यापार परवाना मागे घ्यावा, असे आदेशही गुरुवारी देण्यात आले आहेत.

वादग्रस्त शॅक रेस्टॉरंट

गोव्यातील प्रसिद्ध अशा हणजूण किनार्‍यावरील हे रेस्टॉरंट असून हरियाणातील भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या येथील नृत्यानंतरच्या मृत्यूमुळे ते वादग्रस्त ठरले होते. तसेच 14 वर्षांपूर्वी एक ब्रिटिश युवती स्कार्लेट किलींगचा मृत्यू याच शॅकजवळ झाला होता. सोनाली फोगाट (42) यांनी कर्लिस रेस्टॉरंटला भेट दिली आणि 23 ऑगस्ट रोजी सकाळी त्यांना तेथून इस्पितळात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता. यावेळी रेस्टॉरेंटमध्ये अमली पदार्थ आढळला होता.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT