Latest

नुपूर शर्मांच्या अटकेसंबंधीच्या याचिकेवर तात्काळ सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

मोनिका क्षीरसागर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना अटक करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास बुधवारी (दि.६) सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. न्यायमूर्ती इंदिरा बनर्जी आणि न्यायमूर्ती जेके माहेश्वरी यांच्या अवकाशकालीन खंडपीठासमक्ष या याचिकेचा उल्लेख करण्यात आला होता. पोलिसांकडे तक्रार देवून देखील कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्याची विनंती याचिकाकर्त्या वकिलाकडून करण्यात आली होती.

अवकाशकालीन खंडपीठासमक्ष या याचिकेचा उल्लेख का करण्यात आला? असा सवाल उपस्थित करीत खंडपीठाने रजिस्ट्रार समक्ष याचिका मेंशन करण्यास सांगितले. वकील अबू सोहेल यांच्यावतीने वकील चंद कुरैशी यांनी याचिका दाखल करण्यात आली होती. एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमादरम्यान नुपूर शर्मा यांच्याकडून केल्या गेलेल्या वक्तव्यासंबंधी घटनेची स्वतंत्र, विश्वसनीय आणि निष्पक्ष तपासाचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे.

यापूर्वी शुक्रवारी शर्मा यांच्याविरोधात आणखी एका याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार देत, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जेबी पारदीवाला यांच्या खंडपीठाने शर्मा यांना खडसावले होते. कुठल्याही परिणामांचा विचार न करता बेजबाबदार वक्तव्य केल्याचे न्यायालयाने नुपूर शर्मांना सुनावले होते.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT