Latest

नागपूर : बागेश्वर सरकार समर्थक, हिंदुत्ववादी संघटनांचे नागपुरात आंदोलन

अमृता चौगुले

नागपूर, पुढारी वृत्‍तसेवा : बागेश्वर सरकार विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक झाल्यानंतर आता बागेश्वर सरकार यांचे समर्थक, विहिप, बजरंग दल आणि इतर हिंदुत्ववादी संघटनाकडून नागपुरात आंदोलन करण्यात आले.

संविधान चौक येथे शुक्रवारी दुपारी आंदोलनात अंनिसचे प्रा. श्याम मानव यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करीत हा प्रतिकात्मक पुतळा ताब्यात घेतला. बराच वेळ हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची 'जय श्रीराम' हिंदु ओके सन्मान मे…' अशी घोषणाबाजी केली. केवळ हिंदू धर्मियांना बदनाम करण्याचे हे कटकारस्थान असून हिंदू धर्मीय हे कदापि सहन करणार नाही असा इशारा देण्यात आला.

प्रा. श्याम मानव यांचे बागेशवर महाराज उर्फ धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याविरोधात व्याख्यान झाले. यावेळी देखील दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाली. 30 लाख रुपयांचे अनिसचे आव्हान न स्वीकारताच बागेश्वर सरकार यांनी नागपुरातून पळ काढला असा आरोप या निमित्ताने पुन्हा अनिसने केला होता.

मात्र अनिसच्या लोकांनी रायपूरला यावे, आम्हाला तीस लाख नको आपण त्यांचे पूर्णतः समाधान करू असे प्रति आव्हान धीरेंद्र कृष्ण उर्फ बागेश्वर सरकार यांनी अंनिसला दिले होते. गेले दोन-तीन दिवस या दाव्या-प्रतिदाव्यांनी नागपुरात वातावरण तापले आहे. आमदार मोहन मते यांनी देखील अंधश्रद्धा निर्मूलन समितीला कोणीही घाबरत नसल्याचे आव्हान दिल्यानंतर यात अधिक भर पडली. आज अनेक साधूसंत, बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि बागेश्वर सरकार यांचे नागपूरसह इतर भागातील समर्थक या निमित्ताने रस्त्यावर उतरले. हातात भगवे झेंडे घेऊन ही घोषणाबाजी सुरू होती. अंनिसने आता बागेश्वर सरकार यांनी नागपुरात येऊनच आपले आव्हान पूर्ण करावे अशी भूमिका घेतली आहे.

-हेही  वाचा  

SCROLL FOR NEXT