Latest

Sukhvinder Singh Sukhu : हिमाचल प्रदेश मुख्यमंत्रीपदाची सुखविंदर सुक्‍खू यांनी घेतली शपथ

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते सुखविंदर सुक्‍खू (Sukhvinder Singh Sukhu) यांनी आज (दि.११) हिमाचल प्रदेशचे सातवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्याचवेळी मुकेश अग्निहोत्री यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या दोघांना हिमाचलचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी -वड्रा यांच्यासह पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाच्या राज्य युनिटच्या प्रमुख प्रतिभा सिंह यांची उपस्थिती होती. काँग्रेस निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख असलेले ५८ वर्षीय सुखविंदर सुक्‍खू हिमाचल प्रदेशातून मुख्यमंत्री झाले आहेत. प्रेमकुमार धुमल यांच्यानंतर हमीरपूर जिल्ह्यातील मुख्यमंत्रीपद भूषवणारे ते दुसरे नेते आहेत.

हिमाचल विधानसभा निवडणुकीत एकूण ६८ जागांपैकी ४० जागा जिंकून काँग्रेसने भाजपला सत्तेतून हद्दपार केले . १२ नोव्हेंबर रोजी मतदान झाले आणि गुरुवारी (दि.८) निकाल जाहीर झाला. दरम्यान, सिमला येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सुक्‍खू यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती. चार वेळा आमदार राहिलेले, सुक्‍खू हे बस ड्रायव्हरचे पुत्र आहेत. त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला शिमला येथील हिमाचल प्रदेश विद्यापीठाच्या कॅम्पसमधून सुरुवात केली.

विशेष म्हणजे सुखविंदर यांनी ते मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक नसल्याचे सांगितले होते. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत नाही. काँग्रेस पक्षाने मला राज्याची जबाबदारी दिली होती, पक्षाने मला बरेच काही दिले आहे, त्यामुळे पक्षाचा आदेश मी मान्य करणार, असे ते म्हणाले होते.

अपक्षांचा कल काँग्रेसकडे – सुक्खू

हिमाचल प्रदेशात काँग्रेस स्थिर सरकार देईल. पक्षाचे ४० आमदार आहेत, शिवाय ३ अपक्षांनी आम्हाला पाठिंबा दिला आहेच, या व्यतिरिक्त भाजपचेच ७ ते ८ आमदार आम्हाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले होते.

प्रतिभासिंग आणि मुकेश अग्निहोत्री यांना टाकले मागे

मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस कोणाची निवड करणार यावरून मोठा वाद झाला होता. सुखविंदर सिंग सुक्खू यांच्यासह प्रतिभासिंग, मुकेश अग्निहोत्री हे नेतेही मुख्यमंत्री पदासाठी शर्यतीत होते. त्यातून हिमाचल प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजीही झाली होती. त्यानंतर सर्व निर्णय हायकमांडकडे सोपवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT