Latest

पोलिसांनी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून जाळे वाढवावे : सुधीर मुनगंटीवार

अनुराधा कोरवी

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्हा हा शांतता आणि सामाजिक सलोखा राखणारा जिल्हा आहे. मात्र, काही असामाजिक तत्वांकडून जिल्ह्यात गुन्हेगारी वाढविण्याचे प्रकार निदर्शनास येत आहे. याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी गुप्त खब-यांचे जाळे वाढवावे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून दोषसिद्धीचे प्रमाण वाढवावे, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

संबंधित बातम्या 

नियोजन सभागृह येथे पोलिस विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच उप-प्रादेशिक परिवहन विभागाचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रकुमार परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधु, सहाय्यक पोलिस अधिक्षक आयुष नोपानी, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, राज्य उत्पादन शुल्क अधिकारी संजय पाटील यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक उपस्थित होते.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, पोलिस विभागाने नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून गस्तीवर असणारे वाहन, पोलिस, कर्तव्यावर असलेला वाहतूक पोलिस नक्की कुठे आहेत?, यावर सुध्दा लक्ष ठेवावे. खब-यांचे जाळे वाढविण्यासाठी पोलिस मित्र, मैत्रीण नियुक्त करता येतात, याबाबत विचार करावा. जिल्ह्यातील जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी सोशल मीडियावरील घटनांचे विश्लेषण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करावा. शहरातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी बायपास मार्ग काढावेत तसेच रस्ते कसे विकसीत करता येईल, याबाबत नियोजन करावे, अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या.

बाबुपेठ येथे असलेली पोलिस चौकी एक महिन्याच्या आत पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी पोलिस विभागाने आवश्यक मनुष्यबळाची पुर्तता करावी. या चौकीच्या बांधकामासाठी निधी लागत असल्यास तो उपलब्ध करून देण्यात येईल. सन २०२३ मध्ये दुचाकी अपघातात १६१ जणांचा मृत्यु झाला आहे. यात १५४ जणांचा मृत्यु हा हेल्मेट न वापरल्यामुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हेल्मेट वापराबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. तसेच हेल्मेटचा वापर केल्याने किती जणांचे जीव वाचले आणि न वापरल्याने किती जणांचा मृत्यू झाला, याचा सर्व्हे करावा. हेल्मेटशिवाय (विशिष्ट क्रमांकासह) नवीन वाहनांची नोंदणीच करू नये, याबाबत नियोजन करता येते का, ते तपासावे.

दारुमुळे अनेक कुटुंब उध्वस्त होतात. दारु दुकानांबद्दल नागरिकांच्या तक्रारी असल्यास त्याकडे गार्भियाने लक्ष द्यावे. यापुढे जिल्ह्यात दारुच्या दुकानांची संख्या वाढवू नये, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले. तसेच अवैध वाहतुकीदरम्यान पकडण्यात आलेली जनावरे ठेवण्यासाठी किती जागेची मागणी आहे, त्याबाबतचा प्रस्ताव तयार करावा. जागेची उपलब्धता करून देऊन त्याच्या बाजुला वनविभागातर्फे कुरण विकसीत करण्याचे नियोजन करता येईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मिशन 'टीन्स'चे उद्घाटन

पोलिस अधिक्षक कार्यालय व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अल्पवयीन मुला- मुलींना सायबर क्राईम, लैंगिक शोषण, बॅड टच – गुड टच, पोक्सो कायदा आदींबाबत जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी 'टीन्स' उपक्रम (ट्रेनिंग, एज्युकेटिंग, इंपॉवरिंग, नर्चरींग स्टुडंट) राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. जेणेकरून याबाबत शालेय विद्यार्थ्यांना अवगत करता येईल. तसेच याबाबत जे पिडीत आहेत, त्यांचे मनोर्धर्य उंचाविण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडूनसुध्दा मार्गदर्शन करण्यात येईल. या उपक्रमाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT