Latest

Stock Market Updates | सेन्सेक्स तेजीत, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.३७ लाख कोटींची वाढ, IT कंपन्यांचे शेअर्स वधारले

दीपक दि. भांदिगरे

Stock Market Updates : सकारात्मक जागतिक संकेतांमुळे आज शुक्रवारी शेअर बाजाराने उसळी घेतली. आज सकाळी बाजार खुला होताच सेन्सेक्स तब्बल सुमारे १ हजार अंकांनी वाढून ५८,३०० च्या वर गेला होता. तर निफ्टी निर्देशांक सुमारे ३०० अंकांनी वाढून १७,३०० वर पोहोचला होता. दुपारच्या सत्रात सेन्सेक्समधील तेजी १,१०० हून अधिक वाढली होती. त्यानंतर बाजार बंद होताना ही तेजी काही प्रमाणात कमी झाली. सेन्सेक्स ६८४ अंकांनी ५७,९१९ वाढून बंद झाला. तर निफ्टी १७१ अंकांनी वधारुन १७,१८५ वर बंद झाला.

सेन्सेक्स वधारल्याने गुंतवणूकादारांना ३.३७ लाख कोटींचा फायदा झाला आहे. यामुळे BSE-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २६९.८५ लाख कोटींवरुन २७३.२३ लाख कोटींवर पोहोचले. सेन्सेक्समध्ये एचसीएल टेकचे शेअर्स सर्वाधिक ३.९५ टक्क्यांनी ‍वधारले. इन्फोसिस, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. सेन्सेक्समधील सर्व ३० समभाग हिरव्या रंगात गेले होते.

Infosys ने ६,०२१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवल्यानंतर Infosys चे शेअर्स वाढले. इन्फोसिसचे शेअर्स चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ११ टक्क्यांनी वाढले आहे. Infosys स्टॉकमध्ये जवळपास  ५ टक्के वाढ झाली आहे आणि यामुळे इन्फोसिस भारतातील बाजार भांडवलानुसार चौथी सर्वात मोठी कंपनी बनली आहे.

निफ्टीमध्ये इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, लार्सन अँड टुब्रो आणि बजाज फायनान्स यांचे शेअर्स वधारले.

दरम्यान, भारतीय रुपया सावरत असून आधीच्या ८२.३५ च्या तुलनेत आज शुक्रवारी रुपया डॉलरच्या तुलनेत ८ पैशांनी वाढून ८२.२७ वर खुला झाला. भारतीय बाजाराप्रमाणे आशियाई शेअर बाजारही तेजी दिसून येत आहे. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक सकाळच्या सत्रात २.६७ टक्के म्हणजे ६९९.९० अंकांनी वाढून २६९३६ वर पोहोचला होता.

दरम्यान, कमकुवत जागतिक संकेत तसेच किरकोळ महागाई दर सप्टेंबरमध्ये पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्यामुळे काल गुरुवारी (दि.१३) शेअर बाजारात घसरण झाली होती. एक्सचेंज डेटानुसार, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गुरुवारी १,६३६.४३ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. पण आज शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली.

गुरुवारी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी घसरला होता. काल सेन्सेक्स ३९० अंकांच्या घसरणीसह ५७,२३५ वर बंद झाला. तर निफ्टी १०९ अंकांनी खाली येऊन १७,०१४ वर बंद झाला होता. एनएसई प्लॅटफॉर्मवर विप्रो, अदानी पोर्ट्स, एसबीआय, एल अँड टी आणि एसबीआय लाइफ या कंपन्यांचे शेअर्स ६.६३ टक्क्यांपर्यंत घसरले होते. तर एचसीएल टेक, हिंदाल्को, सन फार्मा, डॉ. रेड्डीज आणि एनटीपीसी यांचे शेअर्स वधारले होते.

क्रिप्टोकरन्सी तेजीत

आज शुक्रवारी सकाळी क्रिप्टोकरन्सीच्या किमतीत पुन्हा तेजी दिसून आली आहे. जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप २.७९ टक्क्यांनी वाढले आहे. सध्या क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप ९४४.२४ अब्ज डॉलर आहे. (Stock Market Updates)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT