Latest

Stock Market Closing | सेन्सेक्स ५९,६०० च्या खाली, IT स्टॉक्सवर दबाव, जाणून घ्या मार्केटमध्ये आज काय घडलं?

दीपक दि. भांदिगरे

Stock Market Closing : कार्पोरेट कंपन्यांच्या तिमाही कमाईचे येत असलेले आकडे आणि कमकुवत जागतिक संकेत यामुळे आज बुधवारी शेअर बाजाराने सपाट सुरुवात केली होती. पण तो घसरणीसह बंद झाला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे १०० अंकांनी खाली येऊन ५९,६४८ वर होता. दुपारच्या सत्रात सेन्सेक्स २०० अंकांनी घसरून ५९,६०० च्या खाली आला. तर निफ्टी १७,६०० वर होता. त्यानंतर सेन्सेक्स १५९ अंकांच्या घसरणीसह ५९,५६७ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी ४१ अंकांनी घसरून १७,६१८ वर स्थिरावला. सेन्सेक्सची सलग सत्रात घसरण झाली आहे.

इन्फोसिस, HCLTech ला फटका

आयटीमधील इन्फोसिस या दिग्गज शेअर्सने आज निराशा केली. HCLTech आणि Infosys चे शेअर्स प्रत्येकी सुमारे २ टक्क्यांनी घसरले. निफ्टी ५० मध्ये हे शेअर्स टॉप लूजर्स होते. HCLTech गुरुवारी आपल्या तिमाही कमाईचा अहवाल जाहीर करणार आहे. या पार्श्वभूमीवर HCL सह IT स्टॉक्स घसरले.

मेटल स्टॉक्स तेजीत, बँकिंग स्टॉक्स घसरले

मेटल स्टॉक्समध्ये नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी, हिंदुस्तान कॉपर, जिंदाल सॉ, जिंदाल स्टील अँड पॉवर, स्टील ॲथॉरिटी ऑफ इंडिया, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील हे शेअर्स आघाडीवर होते. Nifty PSU Bank इंडेक्स आज ०.५ टक्क्यांनी खाला आला. बँकिंग स्टॉक्समध्ये पंजाब अँड सिंध, जेके बँक, इंडियन बँक, कॅनरा बँक, युनियन बँक, पीएनबी यांचे नुकसान झाले.

'हे' शेअर्स घसरले

सेन्सेक्सवर इन्फोसिस, एचसीएल टेक, इंडसइंड बँक, एशियन पेंट्स, विप्रो, एनटीपीसी, टीसीएस, टेक महिंद्रा, अल्ट्रा टेक सिमेंट, सन फार्मा हे शेअर्स घसरले. तर भारती एअरटेल, पॉवर ग्रिड, टाटा स्टील, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, एचडीएफसी, एम अँड एम या शेअर्सनी हिरव्या चिन्हात व्यवहार केला.

झोमॅटो शेअरची किंमत ५ टक्क्यांनी वाढली, जाणून घ्या कारण

आजच्या ट्रेडिंग सत्रात झोमॅटोच्या शेअरची किंमत ५ टक्क्यांनी वाढली. फूड डिलिव्हरी फर्म झोमॅटोने सांगितले की त्यांच्या मालकीचे बहुतेक ब्लिंकिट स्टोअर पुन्हा खुले झाले आहेत. इन्सेंटीव्ह स्ट्रक्चर्समध्ये केलेले बदल मागे घ्यावेत, या मागणीसाठी ब्लिंकिटचे डिलिव्हरी एक्झिक्यूटीव्ह १२ एप्रिलपासून संपावर गेले होते. फूड प्लॅटफॉर्म किराणा युनिटच्या ब्लिंकिटचे भारतात सुमारे ४०० स्टोअर्स आहेत, त्यापैकी ५० स्टोअर्स जी मुख्यतः नवी दिल्लीत आणि आसपासच्या परिसरात आहेत ती १४ एप्रिल रोजी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाच्या मागणीमुळे बंद करण्यात आली होती. (Stock Market Closing)

ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीचा शेअर आज ४.६८ टक्क्यांनी घसरून १,०७७ रुपयांवर आला. या कंपनीने मार्च तिमाहीत अपेक्षेपेक्षा कमी उलाढालीचा अहवाल दिल्यानंतर त्यांच्या शेअर्सना फटका बसला.

आशियाई बाजारातही तेजीला ब्रेक

जपानचा निक्केई निर्देशांकाच्या आठ दिवसांच्या तेजीला ब्रेक लागला. निक्केई ०.१८ टक्के घसरून २८,६०६ अंकावर बंद झाला. टॉपिक्स निर्देशांकही ०.०२ टक्के खाली येऊन २,०४० वर स्थिरावला.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT