Latest

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स दुसऱ्या दिवशीही धडाम, दोन दिवसांत गुंतवणूकदारांचे बुडाले ५.७ लाख कोटी

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : जागतिक कमकुवत संकेतांमुळे आज गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार कोसळला. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स ८०० अंकांनी घसरून ६५ हजारांच्या खाली आला. तर निफ्टी १९,३०० वर आला. त्यानंतर सेन्सेक्स आज ५४२ अंकांनी घसरून ६५,२४० वर स्थिरावला. तर निफ्टी १४४ अंकांच्या घसरणीसह १९,३८१ वर बंद झाला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाले. दोन दिवसांत सेन्सेक्सने १५०० हून अधिक अंक गमावले आहेत. बाजारातील घसरणीमुळे दोन दिवसांत गुंतवणूकदारांना ५.७ लाख कोटींचा फटका बसला असल्याचे द इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (Stock Market Closing Bell)

परदेशी गुंतवणूकदारांकडून होत असलेली विक्री आणि यूएस बाँड उत्पन्नात वाढ झाल्यानेही शेअर बाजाराचा मूड बिघडला. बाजारात विक्रीचा सपाटा कायम राहिल्याने हेवीवेट स्टॉक्सचे नुकसान झाले. मुख्यतः बँकिंग, रियल्टी, मेटल शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री दिसून आली. पण पहिल्या तिमाहीतील कमाईच्या अहवालामुळे फार्मा स्टॉक्सना सपोर्ट मिळाला. मीडिया आणि हेल्थकेअर शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने (Morgan Stanley) भारताचे रेटिंग 'ओव्हरवेट'मध्ये अपग्रेड केले. तरीही त्याचा प्रभाव बाजारात दिसून आला नाही.

'हे' आहेत टॉप लूजर्स

सेन्सेक्स आज ६५,५५० वर खुला झाला होता. त्यानंतर तो ६४,९६३ अंकांपर्यंत खाली आला. सेन्सेक्सवर एनटीपीसी, इन्फोसिस, जेएसडब्ल्यू, पाॅवर ग्रिड, रिलायन्स, सन फार्मा वगळता इतर सर्व शेअर्स लाल चिन्हात बंद झाले. टायटन, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स टॉप लूजर्स होते. हे शेअर्स २ ते ३ टक्क्यांपर्यंत घसरले. एसबीआय, नेस्ले इंडिया, एम अँड एम, टीसीएस बजाज फायनान्स, ॲक्सिस बँक, विप्रो, भारती एअरटेल, मारुती, आयटीसी, इंडसइंड बँक, एशियन पेंट्स हे शेअर्स सुमारे १ टक्क्यांनी घसरले.

वेदांताला मोठा फटका

वेदांताचे शेअर्स (Vedanta Share Price) बीएसईवर गुरुवारच्या इंट्राडे ट्रेडमध्ये ९ टक्क्यांनी घसरून २४८ रुपयांवर आले. त्यानंतर हा शेअर २५३ रुपयांवर स्थिरावला. वेदांता लिमिटेडच्या प्रमोटर्सपैकी एक असलेल्या ट्विन स्टार होल्डिंग्सने ब्लॉक डीलद्वारे कंपनीतील ४.३ टक्के हिस्सा विकल्याच्या वृत्ताने वेदांताचे शेअर्स गडगडले आहेत. (Stock Market Closing Bell)

डेल्टा कॉर्पचे शेअर्स घसरले

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कौन्सिलने बुधवारी कॅसिनो, ऑनलाइन गेमिंग आणि हॉर्स रेसिंगवरील २८ टक्के कर कायम ठेवल्यानंतर डेल्टा कॉर्पचे शेअर्स (Delta Corp Share Price) ८ टक्के घसरून १८१ रुपयांवर आले. दुपारच्या सत्रात हा शेअर ५ टक्के घसरून १८६ रुपयांवर होता.

गुंतवणूकदारांकडून शेअर्सची विक्री

NSE डेटानुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) बुधवारी निव्वळ आधारावर १,८७८ कोटी रुपयांच्या शेअर्सची आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) २.२३ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.

जागतिक बाजारात घसरण

फिच या पतमानांकन संस्थेने अमेरिकेचे रेटिंग घटवल्याने जगभरातील शेअर बाजारात पडझड कायम आहे. अमेरिकेतील शेअर बाजारात घसरण झाली. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज ०.९८ टक्के, एस अँड पी १.३८ टक्के आणि नॅस्डॅक कंपोझिट २.१७ टक्क्यांनी घसरला. आशियाई बाजारातही हीच स्थिती राहिली. जपानचा निक्केई १ टक्के, चीनचा शांघाय कंपोझिट ०.२ टक्के, दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.४५ टक्क्यांनी निर्देशांक घसरला. युरोपियन शेअर्स गुरुवारी तिसऱ्या सलग सत्रात घसरले. वाढलेले यूएस बाँड उत्पन्न आणि कमी उत्पन्नाच्या अहवालांमुळे आणि बँक ऑफ इंग्लंडच्या व्याजदर निर्णयापूर्वी गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम झाला. पॅन-युरोपियन STOXX ६०० निर्देशांक ०.६ टक्के घसरला.

रुपया निच्चांकी पातळीवर

आज डॉलरच्या तुलनेत रुपया निच्चांकी पातळीवर आला आहे. रुपया प्रति डॉलर ८२.७७७५ वर आला आहे. रुपयाची ३० मे नंतरची सर्वात कमकुवत स्थिती आहे. याआधी रुपया ८२.५८२५ वर बंद झाला होता. अमेरिकेच्या शेअर बाजारातील जोरदार विक्रीच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी घसरले. यामुळे रुपयावर दबाव वाढला.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.