Latest

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा सुसाट, उच्चांकाला गवसणी, कुठले शेअर्स वाढले?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातून कमकुवत संकेत असतानाही आज गुरुवारी (दि. ६) देशांतर्गत बाजारातील सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीने (Nifty) पुन्हा विक्रमी उच्चांक गाठला. सावध सुरुवात केलेल्या सेन्सेक्सने आज ६५,८०० चा टप्पा पार केला. तर निफ्टीने १९,५०० जवळ जात सर्वकालीन उच्चांक गाठला. त्यानंतर सेन्सेक्स ३३९ अंकांच्या वाढीसह ६५,७८५ वर बंद झाला. तर निफ्टी ९८ अंकांनी वाढून १९,४९७ वर स्थिरावला. आजच्या तेजीमुळे गुंतवणूकदार एका सत्रात सुमारे १.८ लाख कोटींनी श्रीमंत झाले आहेत.

खालच्या स्तरावरुन आज प्रमुख निर्देशांकात चांगली रिकव्हरी दिसून आली. बाजारातील तेजीत रियल्टी, PSU बँकिंग स्टॉक्स आघाडीवर राहिले. आयटी वगळता अन्य क्षेत्रीय निर्देशांकांनी आज हिरव्या चिन्हात व्यवहार केला. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.८ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.७ टक्के वाढला. सुमारे १,८२५ शेअर्स वाढले, तर १,३७३ शेअर्स घसरले. ११९ शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून आला नाही. (Stock Market Closing Bell)

सेन्सेक्स काल ६५,४४६ वर बंद झाला होता. आज तो ६५,३९१ वर खुला झाला होता. तर आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने ६८,८३२ पर्यंत उसळी घेतली. निफ्टीवरील टॉप गेनर्समध्ये M&M, अपोलो हॉस्पिटल्स, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा मोटर्स यांचा समावेश होता, तर आयशर मोटर्स, HDFC लाइफ इन्शुरन्स, मारुती सुझुकी, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि बजाज फायनान्स यांचे नुकसान झाले.

एम अँड एम टॉप गेनर

सेन्सेक्सवर एम अँड एम हा शेअर सर्वांधिक ४.८४ टक्के वाढून १,५४६ वर पोहोचला. पॉवर ग्रिड, टाटा मोटर्स, रिलायन्स, एनटीपीसी, ॲक्सिस बँक, नेस्ले इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट, एलटी हे शेअर्स वाढले. तर एचसीएल टेक, मारुती, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, आयटीसी हे शेअर्स घसरले.

बाजार भांडवलही उच्चांक पातळीवर

आज सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल (market capitalisation) ३०१.१० लाख कोटींवर पोहोचले. बाजार भांडवलाचा हा सर्वकालीन उच्चांक आहे. बाजारातील तेजीचा मागोवा घेत आज BSE-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल (mcap) ३,०१,१०,५२६.१२ कोटी रुपयांच्या सर्वकालीन शिखरावर पोहोचले. (Mcap of BSE-listed firms)

बीएसई सेन्सेक्स २६ जून ते ४ जुलै दरम्यानच्या काळातील विक्रमी तेजीत सुमारे २,५०० अंकांनी वाढला. ४ जुलै रोजी सेन्सेक्स ६५,६७२ अंकांवर पोहोचला होता. हा सेन्सेक्सचा सर्वकालीन उच्चांक आहे. काल बुधवारी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २९९.९० लाख कोटींवर होते. त्याने आज ३०१ लाख कोटींचा टप्पा पार केला. (Stock Market Closing Bell)

एक्सचेंज डेटानुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) भारतीय बाजारात खरेदी कायम ठेवली आहे. त्यांनी बुधवारी १,६०३.१५ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. (Mcap of BSE-listed firms)

जागतिक बाजारातील स्थिती काय?

अमेरिकेतील शेअर बाजार बुधवारी घसरण झाली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने अतिरिक्त व्याजदरवाढीचे संकेत दिल्याचे पडसाद शेअर बाजारात उमटले. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज (Dow Jones Industrial Average) १२९ अंकांनी घसरून ३४,२८८ वर बंद झाला. एस अँड पी निर्देशांक देखील घसरला आहे. तर नॅस्डॅक कंपोझिट २५ अंकांनी घसरून १३,७९१ वर आला. आशियाई बाजारातही कमकुवत स्थिती आहे. MSCI च्या आशिया-पॅसिफिक शेअर्सच्या विस्तृत निर्देशांकात ०.७ टक्के घसरण झाली. जपानचा निक्केई (Japan's Nikkei) १ टक्क्यांहून अधिक घसरला आहे. हाँगकाँगचा हँग सेंग (Hong Kong's Hang Seng) आणि तैवानमधील निर्देशांकही घसरला. (Stock Market Closing Bell)

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT