Latest

Jamshed J Irani | स्टील मॅन ऑफ इंडिया जमशेद जे इराणी यांचे निधन, ४३ वर्षे होते टाटा स्टीलच्या सेवेत

दीपक दि. भांदिगरे

जमशेदपूर : पुढारी ऑनलाईन; स्टील मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे जमशेद जे इराणी (Jamshed J Irani) यांचे सोमवारी रात्री जमशेदपूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती टाटा स्टीलकडून देण्यात आली आहे. ते ८५ वर्षांचे होते. इराणी चार दशकांहून अधिक काळ टाटा स्टीलशी जोडले गेले होते. ते टाटा स्टीलच्या संचालक मंडळातून जून २०११ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांनी तब्बल ४३ वर्षे टाटा स्टीलला सेवा दिली. त्यांनी टाटा स्टील कंपनीला विविध क्षेत्रात आंतरराष्ट्रीय नावलौकिक मिळवून दिला.

२ जून १९३६ रोजी नागपुरात जिजी इराणी आणि खोरशेद इराणी यांच्या घरी जन्मलेल्या डॉ. इराणी यांनी १९५६ मध्ये नागपूरच्या सायन्स कॉलेजमधून बीएस्सी आणि १९५८ मध्ये नागपूर विद्यापीठातून भूविज्ञान विषयात एमएससी शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी ब्रिटनमधील शेफिल्ड विद्यापीठातून १९६० मध्ये धातूशास्त्रात पदव्युत्तर (Masters in Metallurgy) आणि १९६३ मध्ये पीएचडी शिक्षण पूर्ण केले.

त्यांनी १९६३ मध्ये शेफील्डमधील ब्रिटीश आयर्न अँड स्टील रिसर्च असोसिएशनमधून त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. पण राष्ट्राच्या प्रगतीमध्ये योगदान देण्याची त्यांची इच्छा होती. यासाठी ते टाटा आयर्न अँड स्टील कंपनी (आताची टाटा स्टील) मध्ये रुजू होण्यासाठी भारतात परतले. ते सुरुवातीला संशोधन आणि विकास प्रभारी संचालकांचे सहाय्यक म्हणून फर्ममध्ये रुजू झाले.

१९७८ मध्ये ते जनरल सुपरिटेंडंट, १९७९ मध्ये जनरल मॅनेजर आणि १९८५ मध्ये टाटा स्टीलचे अध्यक्ष बनले. १९८८ मध्ये टाटा स्टीलचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि १९९२ मध्ये व्यवस्थापकीय संचालक झाले. २००१ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.

१९८१ मध्ये ते टाटा स्टीलच्या बोर्डात रुजू झाले होते आणि २००१ पासून ते पुढे एक दशकभर ते बिगर-कार्यकारी संचालक (Non-Executive Director) होते. टाटा स्टील आणि टाटा सन्स व्यतिरिक्त डॉ. इराणी (Jamshed J Irani) यांनी टाटा मोटर्स आणि टाटा टेलिसर्व्हिसेससह अनेक टाटा समूह कंपन्यांचे संचालक म्हणून काम केले. इराणी यांच्या पश्चात त्यांची पत्नी डेझी इराणी आणि त्यांची तीन मुले झुबिन, निलोफर आणि तानाज असा परिवार आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT