फॉक्सकॉन पाठोपाठ महाराष्ट्राला दुसरा दणका; टाटा-एअरबस प्रकल्पही गुजरातकडे | पुढारी

फॉक्सकॉन पाठोपाठ महाराष्ट्राला दुसरा दणका; टाटा-एअरबस प्रकल्पही गुजरातकडे

मुंबई/नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  अ‍ॅपलच्या आयफोनची निर्मिती करणार्‍या वेदांता-फॉक्सकॉनचा सेमी कंडक्टर निर्मितीचा प्रकल्प गुजरातने पळवल्यानंतर ज्या महाप्रकल्पाकडे महाराष्ट्र डोळे लावून बसला होता
तो लढाऊ विमानांच्या निर्मितीचा ‘टाटा-एअरबस’ प्रकल्पही गुजरातकडे गेला आहे.

वडोदरा येथे येत्या 30 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाची कोनशिला बसवली जाईल.
गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचा फक्त मुहूर्त जाहीर होणे बाकी असताना हा आणखी एक प्रकल्प केंद्रातील मोदी सरकारने गुजरातला बहाल केला. भारतातील प्रकल्पासाठी एरोनॉटिकल क्वालिटी अ‍ॅश्युरन्स महासंचालनालयाने (डीजीएक्यूए) अलीकडेच परवानगी दिली आणि आता या प्रकल्पासाठी गुजरातची निवडही जाहीर झाली.

वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प तळेगावऐवजी गुजरातला ढोलेरामध्ये गेल्यानंतर महाराष्ट ?ात प्रचंड राजकीय वादळ उठले आणि आता येऊ घातलेला टाटा-एअरबसचा प्रकल्प तरी महाराष्ट ?ात आणा, अशी मागणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली होती. मात्र, आता हा प्रकल्पही गुजरातकडे गेल्याने शिंदे-फडणवीस सरकारविरुद्ध विरोधक असे फटाके वाजण्यास सुरूवात होईल. एअरबस ही युरोपमधली आघाडीची विमान निर्मिती करणारी कंपनी आहे. आतापर्यंत एअरबस सी- 295 ही लढाऊ विमाने यूरोपमध्येच तयार होत आली. यूरोपच्या बाहेर प्रथमच ती भारतात आणि त्यातही गुजरातमध्ये आता तयार होतील, अशी माहिती संरक्षण खात्याचे सचिव अजय कुमार यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली. एअरबस आणि टाटा ऍडव्हान्सड सिस्टीमस् (टीएएसएल) यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प उभारला जाणार असल्याचे अजय कुमार म्हणाले.

हवाई दलाला लागणार्‍या सी-295 विमानांशिवाय अतिरिक्त विमाने बनविण्याची क्षमतादेखील बडोदा येथील प्रकल्पात असेल. 56 एअरबस सी – 295 विमानांच्या खरेदीचा सौदा सप्टेंबर 2021 मध्ये भारताने केला होता. सुमारे 21 हजार कोटी रुपयांचा हा सौदा होता. त्याची पूर्तता आता भारतातील प्रकल्पातूनच होऊ शकेल.

एअरबस निर्मित सी- 295 वाहतूक विमाने सर्वाधिक प्रमाणात वापरण्याचा मान आता भारतीय हवाई दलाकडे चालत आल्याचे हवाई दलाचे उपप्रमुख एअरमार्शल संदीप सिंग यांनी म्हटले आहे. सी-295 वाहतूक विमानांची पहिली तुकडी हवाई दल बडोद्यातच तैनात करणार असल्याचे ते म्हणाले. या विमानांचा नागरी क्षेत्रातही मोठा उपयोग होऊ शकतो आणि प्रसंगी आपत्कालीन परिस्थितीतही ती उपयोगी पडणार आहेत.

  • वेदांता-फॉक्सकॉनच्या प्रकल्पासाठी गुजरातपेक्षा महाराष्ट्रातील परिस्थिती सर्वच बाबतीत अनुकूल होती.
  • औद्योगिक वातावरण, तंत्रकुशल कामगार वर्ग आणि शासकीय सवलती या तिन्हीबाबतीत महाराष्ट ्र आघाडीवर
    असताना फॉक्सकॉन निवडणुकीच्या तोंडावर गुजरातकडे गेला.
  • त्याचवेळी टाटा एअरबस प्रकल्पावर महाराष्ट्राचा हक्क सांगताना नागपुरात सुरू झालेला लढाऊ विमानांच्या
    देखभालीचा प्रकल्प, पुणे, नाशिक येथे असलेले हवाई दलाचे तळ याकडेही लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, या
    दुसर्‍या मोठ्या प्रकल्पानेही गुजरातची निवड करून महाराष्ट ्राची निराशा केली. यावरून आता राजकीय कलगीतुरा रंगण्यास सुरुवात झाली आहे.

 

टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट ्राबाहेर जाऊ नये म्हणून प्रयत्न करा, अशी मागणी मी जुलै महिन्यापासून सातत्याने करत होतो. पण पुन्हा तेच झाले. गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर का जात आहेत? खोके सरकारवर उद्योग जगताचा विश्वास उरलेला नाही. आता चार प्रकल्प महाराष्ट्रातून  निसटल्यानंतर तरी उद्योग
मंत्री राजीनामा देणार का?
– आदित्य ठाकरे, शिवसेना नेते

Back to top button