Latest

राज्यात साडेतीन लाख जणांचे ‘डोळे आले’

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात डोळ्यांच्या साथीचा अर्थात 'आय फ्लू'चा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. आतापर्यंत 3 लाख 57 हजार 265 जणांना संसर्ग झाला आहे. बुलडाण्यामध्ये सर्वाधिक 44 हजार 398 आणि उल्हासनगरमध्ये सर्वांत कमी 20 रुग्ण आढळले आहेत. अ‍ॅडिनो विषाणूमुळे डोळ्यांचा संसर्ग वाढीस लागला आहे. यामध्ये डोळे लाल होणे, वारंवार पाणी येणे, सूज येणे अशी लक्षणे दिसून येतात. आजारासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वैयक्तिक स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे.

वारंवार हात धुणे, डोळ्यांना हात न लावणे, घरामध्ये विलीगीकरणात राहावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. बुलडाण्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये 'आय फ्लू'चे 28 हजार 42 रुग्ण आहेत. त्यापैकी 6720 रुग्ण पुणे शहरात, 6010 रुग्ण पिंपरी-चिंचवडमध्ये, तर 15 हजार 312 रुग्ण पुणे ग्रामीण भागात आहेत. जळगावमध्ये 22 हजार 417, नांदेडमध्ये 18 हजार 996 आणि चंद्रपूरमध्ये 15 हजार 348 रुग्ण आहेत.

प्रतिबंधात्मक उपाययोजना

  • साथ सुरू असलेल्या भागामध्ये आरोग्य कर्मचार्‍यांमार्फत घरोघरी सर्वेक्षण.
  • आरोग्य शिक्षणाचे प्रोटोटाइप तयार केले आहेत.
  • साथीच्या भागांमध्ये शालेय मुलांची डोळ्यांची तपासणी करून उपचार.
  • सर्व आरोग्य संस्थांमध्ये आजाराच्या उपचारांसाठी लागणारी औषधे उपलब्ध.
  • राष्ट्रीय विषाणू संस्था आणि राज्यातील शीघ्र प्रतिसाद पथकाने आळंदी येथील साथीचे अन्वेषण केले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT