Latest

Covid Vaccine | कोरोनाला कोण विचारेना! राज्यात मुदत संपलेल्या १३ लाखांवर लसी केल्या नष्ट

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोव्हिड लसीसाठींची मागणी कमालीची घटली असल्याने राज्यात मुदत संपलेल्या १३ लाख ४० हजार डोस नष्ट करावे लागले आहेत. नष्ट केलेल्या डोसची एकूण किंमत जवळपास २६ कोटी इतकी आहे. यामध्ये कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड, कोर्बव्हॅक्स या तीन प्रकारच्या लसींचा समावेश आहे.

जानेवारी २०२१मध्ये राज्याला १२ कोटी २ लाख कोव्हिशिल्डच्या लसी, २ कोटी ८९ लाख कोव्हॅक्सिन आणि सत्तर लाख कोर्बव्हॅक्सच्या लसी पुरवण्यात आल्या होत्या. राज्यात ९ कोटी १४ लाख इतके नागरिक कोव्हिडीवरील लस घेण्यासाठी पात्र होते. यातील ९२ टक्के लोकांनी पहिला डोस घेतला, तर ८५ टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला तर फक्त २० टक्के नागरिकांनी बुस्टर डोस घेतला. बुस्टर डोस घेण्यासाठी पात्र असलेल्या जवळपास ९ कोटीवर लोकांनी अजूनही हा डोस घेतलेला नाही. विशेष म्हणजे १ कोटी लोकांनी पहिला डोसही घेतलेला नाही, असे हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने दोनशे रुपयांना एक डोस विकत घेतला होता, म्हणजेच जवळपास २६ कोटी रुपयांचे डोस वाया गेले आहेत. या वर्षी मार्च आणि एप्रिलमध्ये कोरोनाची सौम्य साथ आलेली होती, त्या वेळी खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने iNCOVACCचे २० हजार डोस विकत घेतले होते. या लसीची मुदत मे-जूनमध्ये संपणार आहे. सांगलीत सर्वाधिक १ लाख ८ हजार ५६० इतक्या लसी नष्ट करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT