पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि मनदीप सिंग यांच्या हॅटट्रिकच्या जोरावर भारतीय संघाने आज (दि.२६) आशियाई क्रीडा स्पर्धेतील (Asian Games Hockey) पुरुष हॉकी स्पर्धेत सिंगापूरचा 16-1 असा पराभव केला. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने उझबेकिस्तानचा 16-0 असा पराभव केला होता. आता भारताची लढत गतविजेत्या जपानशी 28 सप्टेंबररोजी साखळी सामन्यात होईल.
संबंधित बातम्या
भारतासाठी हरमनप्रीतने चार (24 व्या, 39 व्या, 40 व्या, 42 व्या मिनिटाला), मनदीपने तीन (12 व्या, 30 व्या आणि 51 व्या मिनिटाला), वरुण कुमारने दोन (55 व्या मिनिटाला), अभिषेकने दोन (51 व्या आणि 52 व्या मिनिटाला) व्ही एस प्रसादने (23 व्या मिनिटाला) गोल केले. गुरजंत सिंग (22वा), ललित उपाध्याय (16 वा), शमशेर सिंग (38 वा) आणि मनप्रीत सिंग (37 वा) यांनी गोल केले. सिंगापूरसाठी एकमेव गोल मोहम्मद झाकी बिन जुल्करनैन याने ५३ व्या मिनिटाला केला. भारताने संथ सुरुवात केली, पण चेंडूवर नियंत्रण राखले. (Asian Games Hockey)
सहाव्या मिनिटाला भारताला गोल करण्याची संधी होती. पण सुखजित सिंगचा फटका सिंगापूरची गोलरक्षक सँड्रा गुगनने रोखला. पुढच्याच मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण कर्णधार हरमनप्रीत सिंगची फटकेबाजी व्यर्थ गेली. दोन मिनिटांनंतर मनदीपने दुसरा पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. पण सिंगापूरच्या गोलरक्षकाने अप्रतिम बचाव केला. अखेर 12 व्या मिनिटाला गुरजंतच्या पासवर मनदीपने गोल करत खाते उघडले. पहिल्या क्वार्टरच्या शेवटच्या दोन मिनिटांत भारताला मिळालेले दोन पेनल्टी कॉर्नर व्यर्थ गेले. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताला पाच पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण एकही गोल करू शकला नाही.
भारताने दुसऱ्या क्वार्टरमध्ये चांगला खेळ करत सलग पाच गोल नोंदवले. दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला ललितने भारताची आघाडी भक्कम केली. २१ व्या मिनिटाला गुरजंतने तिसरा गोल केला. ज्याला मनदीपने पास दिला. एका मिनिटानंतर विवेक सागर प्रसादने भारताचा चौथा गोल नोंदविला. पुढच्याच मिनिटाला हरमनप्रीतने पेनल्टीवर गोल करत स्कोअर 5-0 असा केला. मध्यंतरापूर्वी, मनदीपने पेनल्टी कॉर्नरवर अमित रोहिदासच्या फ्लिकवर गोल केला. ब्रेकनंतर भारताला 11वा पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण हरमनप्रीतचा फ्लिक गोलच्या पुढे गेला.
मनप्रीतने 37 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीतच्या फ्लिकवर रिबाउंडवरून गोल करत भारताची आघाडी वाढवली. त्यानंतर हरमनप्रीतने दोन पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले. समशेरनेही गोल केला. हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर चौथा गोल केला. वरुणने सलग दोन पेनल्टी कॉर्नरचे रुपांतर केले आणि शेवटच्या पाच मिनिटांत दोन गोल केले. या सामन्यात भारताला 22 पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण फक्त 8 वरच गोल करता आला.