Indian wrestlers’ protest : ..तर आशियाई स्पर्धेवर बहिष्कार! | पुढारी

Indian wrestlers' protest : ..तर आशियाई स्पर्धेवर बहिष्कार!

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणार्‍या कुस्तीपटूंनी आपली मागणी मान्य झाली नाही तर यावर्षी होणार्‍या आशियाई स्पर्धेवर बहिष्कार घालणार असल्याची धमकी दिली आहे. ऑलिम्पिक पदक विजेती मल्ल साक्षी मलिकने सांगितले की, आमच्या सर्व मुद्द्यांचे निराकारण झाल्यानंतरच आम्ही आशियाई स्पर्धेत सहभागी होऊ. आम्ही कोणत्या मानसिकतेतून जात आहोत याची तुम्हाला कल्पना येत नसेल, असेही साक्षीने सांगितले. (Indian wrestlers’ protest)

बृजभूषण यांनी महिला पैलवानांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करीत कुस्तीपटू बजरंग पुनिया, विनेश फोगट, साक्षी मलिक यांनी 23 एप्रिलपासून आंदोलन पुकारले आहे. याचाच एक भाग म्हणून हरियाणाच्या सोनिपतमध्ये खाप नेत्यांसोबत महापंचायत झाली. यावेळी साक्षी बोलत होती. आंदोलनकारी मल्लांमध्ये फूट पडल्याच्या वृत्ताचाही तिने इन्कार केला. (Indian wrestlers’ protest)

या महापंचायतमध्ये पैलवानांनी त्यांची आणि सरकारची झालेल्या चर्चेचा तपशील सांगितला. क्रीडामंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत 15 जूनपर्यंत सरकारने वेळ मागितला असल्याचेही यावेळी सांगितले.

महिला कुस्तीपटूंना बंगल्यावर बोलावले जाई

महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंहांवर केलेले आरोप शंभर टक्के खरे आहेत, या महिला कुस्तीपटूंचे गेल्या अनेक वर्षांपासून शोषण होत आहे. बृजभूषण सिंह या महिला कुस्तीपटूंना लखनौ आणि दिल्लीतील आपल्या बंगल्यावर बोलवत होते. जे खेळाडू यासाठी नकार देत त्यांना मॅच खेळण्यापासून रोखले जात होते, असा आरोप कुस्तीपटूंचे फिजिओथेरपिस्ट परमजीत मलिक यांनी केले असून यामध्ये इतरही लोकांचा हात असल्याचा त्यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.

मलिक यांनी इंडिया टीव्हीसोबत फोनवरून बोलताना हे गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, बृजभूषण सिंहांवरील आरोप तर शंभर टक्के खरे आहेत. उलट आरोपी तर इतरही अनेक लोक आहेत, पण बदनामीमुळे या मुली पुढे येत नाहीत. सुमारे 100 मुली अशा असतील ज्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपात शोषण झाले आहे. जसे की त्यांचे मानसिक स्वरूपात आणि शारीरिक स्वरूपात शोषण करण्यात आले आहे.

मी एकटाच असा नाही जो कुस्तीशी जोडला गेलेलो आहे. जितके कोच आहेत, रेफरी आहेत. तसेच जे मॅनेजमेंटमध्ये खेळाडू राहिले आहेत. सर्वजणांना या गोष्टी माहिती आहेत. लोकांनी काही प्रमाणात आवाजही उठवला होता. पण त्यांचा आवाज दाबण्यात आला आहे, असा आरोपही मलिक यांनी केला आहे.

मला रातोरात हटवले : मलिक

जेव्हा छोट्या-मोठ्या ट्रायल टुर्नामेंट होत असत तेव्हा बृजभूषण सिंह मुलींच्या जवळ यायचे त्यानंतर कोणाच्या गालाला हात लाव, गळ्यात हात टाकणे, कोणाच्या पाठीवरून हात फिरवणे, पाठ थोपटणे या गोष्टी त्यांच्यासाठी सामान्य होत्या. कॅम्पमध्ये बृजभूषण सिंह यांचे सर्व चेलेचपाटे बरोबर ठेवायचे. मुलींनी माझ्याकडे देखील याबाबत तक्रारी केल्या होत्या. 2006 मध्ये मी पत्रकार परिषद घेतली होती, त्यानंतर मला तिथून रातोरात काढून टाकण्यात आले, असे मलिक म्हणाले.

हेही वाचा;

Back to top button