सिंधुदुर्ग : पुढारी वृत्तसेवा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावर 5 ते 13 डिसेंबर या कालावधीत उतरलेल्या 96 परदेशी प्रवाशांपैकी करण्यात आलेल्या आरटीपीसीआर तपासणीत एक प्रवासी पॉझिटिव्ह आढळला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.
जिल्ह्यातील चिपी विमानतळावर परदेशी पर्यटक उतरू लागले असून 5 डिसेंबर ते 13 डिसेंबर या कालावधीत चिपी विमानतळावर एकूण 96 परदेशी प्रवासी उतरले. त्यापैकी 7 दिवस पूर्ण झालेल्या 25 प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. त्यापैकी सावंतवाडी तालुक्यात एका व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या संपर्कातील 7 जणांचा कोरोना तपासणीसाठीचा अहवाल पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी येथे पाठविण्यात आला आहे. नव्याने पसरणार्या ओमायक्रोन या आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. जिल्ह्यात दाखल होणार्या परदेशी पर्यटकांची तपासणी करण्यात येत आहे.
5 डिसेंबरपासून जिल्ह्यातील चिपी विमानतळावर उतरलेल्या 96 प्रवाशांमध्ये वैभववाडी 2, कणकवली 8, देवगड 15, मालवण 5, कुडाळ 10, वेंगुलेर्र् 15 सावंतवाडी 36, तर दोडामार्ग 5 असे एकूण 96 प्रवासी दाखल झाले. त्यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील 1 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.
जिल्ह्यात ओमायक्रॉनचा अद्याप रुग्ण नाही
जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या तसेच दुसर्या लाटेमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांच्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र आता सध्या जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या फार कमी आहे. तसेच दर दिवशी घेण्यात येणार्या 200-300 टेस्टमध्ये फार कमी अंशी पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. मागील सहा आठवड्याची सरासरी पाहिली असता पॉझिटिव्हीटी रेट 3 टक्के पेक्षाही कमी आहे. सध्या कोरोनाचा नवीन प्रकार आल्याचे समोर आले आहे. मात्र, अद्याप जिल्ह्यात ओमायक्रोनचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
परदेशातून जे नागरिक जिल्ह्यात आलेले आहेत, त्या सर्व प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोनाच्या अनुषंगाने सतर्कता म्हणून जिल्हावासियांनी मास्क वापरावे तसेच वेळोवेळी सॅनिटाईजर, हँडवॉशचा वापर करावा. लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुन्हा पॉझिटिव्ह येण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे ज्या नागरिकांनी अद्याप दुसरा डोस घेतला नाही त्यांनी लवकरात लवकर दुसर्या डोसचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे.
हेही