कोल्हापूर; विकास कांबळे : जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा गेल्या वर्षभरापासून प्रयत्न करत असतानादेखील अजूनही 2 लाख 88 हजार 78 नागरिकांनी अद्याप एकही डोस घेतलेला नाही. या नागरिकांना शोधण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लसीकरण सुरू करण्यात आले. जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. पुढील महिन्यात त्याला वर्ष पूर्ण होईल. लसीकरणाबाबत प्रारंभीच्या काळात अनेक गैरसमज होते. त्यामुळे लसीकरणाला मिळणारा प्रतिसाद कमी होता. यामुळे आरोग्य विभागाने लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी समाजामध्ये जनजागृती करण्यासह विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. अलीकडील काळात तर ओळखपत्राशिवाय लस देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. तरीदेखील लसीकरण केंद्रांवरील कर्मचारी नागरिकांच्या प्रतीक्षेत असायचे.
तिसर्या लाटेची चर्चा सुरू झाली. ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण महाराष्ट्रातदेखील सापडू लागले. अशा परिस्थितीत दोन्ही डोस घेतलेल्यांना तिसर्या लाटेचा धोका कमी असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त करण्यात आले. त्यानंतर मात्र पुन्हा लसीकरणाला गती आली. ओमायक्रॉनच्या भीतीने नागरिकांनी लस घेण्यासाठी लसीकरणकेंद्रांवर गर्दी करण्यास सुरुवात केली. तरीदेखील 18 वर्षांवरील 2 लाख 88 हजार 78 नागरिक अद्याप लसीकरण केंद्रांकडे फिरकलेच नाहीत.
एकही डोस न घेतलेल्या नागरिकांची संख्या हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक आहे. या तालुक्यातील 47 हजार 453 नागरिकांनी अद्याप पहिलादेखील डोस घेतलेला नाही. त्यानंतर शिरोळ तालुक्याचा क्रमांक लागतो. शिरोळ तालुक्यातील 43 हजार 640 नागरिकांनी एकही डोस घेतलेला नाही. गगनबावडा तालुक्यात एकही डोस न घेतलेल्या नागरिकांची संख्या सर्वात कमी 1 हजार 735 इतकी आहे.
जिल्ह्यातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे डिसेंबरअखेरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी लसीकरण केंद्रे तसेच लसीकरणाची वेळ वाढविण्यात येणार आहे. पूर्वी पाच वाजेपर्यंत लस देण्यात येत होती. आता लसीकरणाची वेळ सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत करण्यात आली आहे.
– डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्याधिकारी