Latest

धक्कादायक! ९ वर्षीय मुलाचे अपहरण; २३ लाखांची मागणी आणि खून

निलेश पोतदार

बदलापूर : पुढारी वृत्‍तसेवा एका ९ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून त्‍याची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बदलापूर जवळील गोरेगावात हा प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. इबादत बुबेरे (वय 9 ) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, इबादत रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गावातील मस्जिदमध्ये नमाज पढून बाहेर पडला. त्यावेळेस गावातीलच एका व्यक्तीने त्याचे अपहरण केले. अपहरणकर्त्याने इबादतच्या वडिलांना फोन करून 23 लाख रुपये देण्याची मागणी केली. मात्र त्यानंतर अपहरणकर्त्याचा फोन बंद झाला. दरम्यान गावकऱ्यांनी रात्रभर इबादतचा शोध घेतला. बदलापूर ग्रामीण पोलिस आणि क्राइम ब्रांचने घटनास्थळी येऊन तपास केला. त्यानंतर गावात राहणाऱ्या अपहरणकर्त्याच्या घरातच इबादतचा गोणीत भरलेला मृतदेह आढळून आला. पोलिसांनी संशयीत आरोपीला ताब्यात घेतले असून मृतदेह मुंबईच्या जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. ऐन रमजानच्या तोंडावर ही हत्या झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

गावातच राहणाऱ्या ओळखीच्याच सबवान मोलवी या इसमाने इबादतची घरात नेऊन हत्या केल्याचे समोर आले असून पोलिसांनी या प्रकरणी त्याला ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती ठाणे ग्रामीण पोलीसचे एसपी डॉ.डी.एस. स्वामी यांनी दिली. संशयीत आरोपी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील असून त्याच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. संशयीत आरोपीचे घर पूर्ण तोडून टाकावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थांच्या आक्रमक मागणीमुळे गोरेगावात रॅपिड ॲक्शन फोर्स तैनात करण्यात आली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्वतः एसपी बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तळ ठोकून बसले आहेत.

इबादतचे वडील टेलरिंगचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करत होते. हालाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असताना 23 लाख रुपयांची खंडणी मागून अपहरणकर्त्याने हत्या का केली असावी हे कोडं पोलिसांना सोडवावा लागणार आहे. या घटनेमुळे गोरेगावात राहणाऱ्या स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक सर्रास फिरत असताना देशात लोकसभेची आचारसंहिता लागल्यावर रेकॉर्डवरील गुंडांचा बंदोबस्त पोलिसांनी करावा अशी मागणी ही आता जोर धरत आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT