Latest

Shivrajyabishek Sohala : शिवराज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्या ‘या’ ३ मोठ्या घोषणा

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Shivrajyabishek Sohala : शिवराज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३ मोठ्या घोषणा केल्या आहेत. प्रतापगड प्राधिकरणाची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी मान्य झाली असून त्याला मंजुरी मिळाली आहे. मुंबईतील महत्वपूर्ण प्रकल्प कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावरून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज रोड, असे नाव देण्यात आले आहे. तर शिवसृष्टीसाठी ५० कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा

स्वराज्याची राजधानी रायगडावर आज मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे. या सोहळ्या प्रसंगी मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यापैकी प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा सर्वात महत्वाची आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या अनेक दिवसापासून प्रतापगड प्राधिकरण करण्याची मागणी केली जात होती. या मागणीला आता मंजुरी मिळाली आहे. तसेच खासदार उदयनराजे भोसले हे प्रतापगड प्राधिकरणाचे अध्यक्ष असतील, अशी घोषणा त्यांनी केली.

मुंबईतील सागरी किनारा मार्गांना (कोस्टल रोडला) छत्रपती संभाजी महाराजांचे नाव

मुंबईची लाईफलाईन असलेल्या सागरी किमारा (कोस्टल रोड) मार्ग प्रकल्पाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे नाव देण्यात आल्याची घोषणा यावेळी शिंदे यांनी केली. काही दिवसांपूर्वी झालेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती कार्यक्रम प्रसंगी त्यांनी याविषयी  माहिती दिली होती.  मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा असून याचे अनेक फायदे होणार आहे.

शिवसृष्टीला ५० कोटी रुपये देणार

आमदार भरत गोगावले यांची अनेक दिवसांपासून पाचाड येथील 45 एकर जागेवर शिवसृष्टी उभारण्यासाठी खर्चाला निधी मिळण्याची मागणी होती. त्यांची ही मागणी मान्य करण्यात आली असून शिवसृष्टीसाठी 50 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच या शिवसृष्टीला आणखी खर्च आला तर नंतरही निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या ठिकाणी आपण आपण शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील शिवसृष्टी उभारू, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. याशिवाय शिवाजी महाराजांची भवानी तलवार आणि वाघनखे परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. असेही त्यांनी म्हटले आहे.

शिवाजी महाराजांच्या शिकवणीनुसार सरकारचा कारभार

याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले, शिवाजी महाराज हे रयतेचे, गोरगरीब जनतेचे, महिला भगिनींचे असे सर्वांचे राजे होते. त्यांनी फक्त स्वराज्य नव्हे तर सुराज्याची कल्पना मांडली. शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराची आदर्श पद्धत हीच आमच्या सरकारची प्रेरणा आणि ऊर्जा आहे. शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे आम्ही गेल्या 11 महिन्यांपासून सरकारचा कारभार चालवत आहोत.

आम्ही राज्यातील प्रत्येक घटकाचा विचार करतो. शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा योजना आणली. महिलांसाठी विविध योजना राबवत आहोत. सिंचन क्षेत्रासाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू केली आहे. आमचे सरकार सर्व सामान्यांचे सरकार आहे. सर्वसामान्यांसाठी कल्याणकारी योजना आम्ही राबवत आहोत.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT