नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाकडून मिळाल्यानंतर ठाकरे गटाने संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने शिवगर्जना अभियान सुरू केले असून, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे रविवारपासून (दि.२६) नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात अभियानाची सुरुवात होणार आहे. अभियानांतर्गत रविवारी नाशिक व लासलगाव येथे मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यास शिवसेनानेते अनंत गिते, युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, दिंडोरीचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांनी दिली. नाशिकच्या सातपूर येथे पपया नर्सरीजवळ सौभाग्य लॉन्स येथे दि. २६ रोजी सकाळी ११ वाजता मेळावा होईल. ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयात व सातपूर येथे अभियानाच्या पूर्वतयारीसाठी बैठक झाली.
यावेळी सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, विनायक पांडे, विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी, देवानंद बिरारी, देवा जाधव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. लासलगाव येथे रविवारी २६ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता मनकर्णिका हॉलमध्ये मेळावा होणार आहे.
हेही वाचा :