Latest

पनवेलकरांना दुहेरी मालमत्ता करातून मुक्त करणार! : उद्धव ठाकरेंची ग्वाही

अनुराधा कोरवी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : कल्याण-डोंबिवली येथील लोढांच्या पलावा सिटीला मालमत्ता करातून वगळले आहे, तर दुसरीकडे पनवेलकरांकडून सिडकोमार्फत मालमत्ता कर आकारला जात आहे. विशेष म्हणजे कोणत्याही सेवा न देता पनवेल महापालिकेकडूनही कर वसुली केली जात आहे. ही दुहेरी करवसूली म्हणजे जुलुमशाही आहे. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यानंतर मुंबईप्रमाणे पनवेलकरांची दुहेरी मालमत्ता करातून मुक्तता करणार, अशी ग्वाही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.

संबंधित बातम्या 

पनवेलच्या माजी नगरसेविका व कॉलनी फोरमच्या अध्यक्षा लीना गरड यांच्यासह फोरमच्या कामोठे, खारघर तसेच पनवेलमधील असंख्य कार्यकर्त्यांनी सोमवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. शिवसेना भवन येथे हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी बोलताना सिनेअभिनेता सलमान खान घरावर झालेल्या गोळीबारासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, राज्यात गुंडगिरी सुरु असताना सरकारला सरकार चालविण्याचा कुठलाच अधिकार राहिलेला नाही आहे. हे घटनाबाह्य सरकार सत्ता चालवित असून त्यांच्यात ही गुंडागर्दी रोखण्याची हिंमत नाही आहे.

पुत्रप्रेमामुळेच भारत क्रिकेटचा सामना हरला

शिवसेना पुत्रप्रेमामुळे तर राष्ट्रवादी काँग्रेस पुत्री प्रेमामुळे फुटली, अशी टीका केंद्रिय मंत्री अमित शाह यांनी केली होती, त्याचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत क्रिकेटचा अंतिम सामना हरला, असा टोला लगावत तुमच्यासारखे पुत्रप्रेम मी तरी अजून दाखवलेले नाही. आता सध्या भाजपचे अध्यक्ष वेगळे आहेत, त्यामुळे अमित शहांना पक्षात किती अधिकार आहे, ते अध्यक्षच सांगू शकतील. पण, अमित शहांना सांगायचेय की तुमच्या आणि तुमच्या चेले-चपाट्यांच्या बोलण्यात एकवाक्यता असू द्या. कारण काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो, असे म्हणाले होते. त्यामुळे तुमची लाज तुमचे चेले चपाटे काढताहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

पक्षाचे नेतृत्व खंबीर हवे

सांगलीतून विशाल पाटील हे अपक्ष उमेदवारी दाखल करणार आहेत, यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, प्रत्येक पक्षाचे नेतृत्व खंबीर असायला हवे. नेतृत्व खंबीर असल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगायला हवे की, आपण जेव्हा आघाडी, युती करतो तेव्हा काही वेळेला जागांच्याबाबतीत देवाण-घेवाण करावी लागतील. जसे कोल्हापूर, रामटेक, अमरावती या जिंकलेल्या जागा आम्ही काँग्रेसला दिल्या आहेत. आम्हाला सरकार बदलायचे असल्याने या जागा आम्ही काँग्रेसला दिल्या. आता कोल्हापूर, सांगली येथे आमचे तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते कामाला लागले असून एका-दोघांची महत्वाकांक्षा असेल तर त्या पूर्ण करण्यासाठी पक्षनेतृत्व समर्थ असतात.

2021 ला शिंदेचे आश्वासन, पण दुहेरी कर अजूनही तसाच

सप्टेंबर 2021 मध्ये तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पनवेलच्या दुहेरी करासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली होती. या बैठकीत पनवेल महापालिका क्षेत्रात राहणार्‍या नागरिकांना दुहेरी मालमत्ता कराच्या जाचातून सोडवण्यासदंर्भात चर्चा होवून सिडको प्राधिकरणाकडून पुरवल्या जाणार्‍या नागरी सेवा दोन महिन्यात पनवेल महापालिकेला हस्तांतरीत करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले होते. ही प्रक्रिया झाल्यानंतर दुहेरी कराचा मुद्दा कायमस्वरुपी निकाली निघेल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले होते. मात्र, या आश्वासनाला अडीचवर्षे उलटून गेली तरी पनवेलकरांची या दुहेरी करातून सुटका झालेली नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT