प्रवाशांच्या मदतीसाठी आता ‘प्रवासी मित्र’; एसटी महामंडळाची अभिनव योजना | पुढारी

प्रवाशांच्या मदतीसाठी आता ‘प्रवासी मित्र’; एसटी महामंडळाची अभिनव योजना

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : उन्हाळी सुट्टीत गावी जाणार्‍या प्रवाशांच्या समस्या, तक्रारींचे निवारण करण्यासाठी एसटी महामंडळाने प्रवासी मित्र ही अभिनव संकल्पना राबविली आहे. मुंबईसह राज्यातील काही प्रमुख थांब्यावर प्रवासी मित्रांची नेमणूक होणार आहे. 15 एप्रिल ते 15 जून दरम्यान सकाळी 8 ते 11 आणि दुपारी 4 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत विभागीय कार्यालय व विभागीय कार्यशाळेतील सर्व पर्यवेक्षक व प्रशासकीय कर्मचार्‍यांची नियुक्ती प्रवासी मित्र म्हणून करण्यात येणार आहे.

राज्यात दररोज सुमारे 12 हजार 600 एसटी रस्त्यावर धावतात. त्यातून सरासरी 55 लाख प्रवासी प्रवास करतात. यातून दिवसाला एसटीला 20 ते 30 कोटी रुपये प्रतिपूर्ती रक्कमेसह उत्पन्न मिळते. 15 एप्रिल पासून उन्हाळी हंगाम सुरू झाला आहे. एसटीच्या प्रवासाला नागरिक प्राधान्य देतात. परंतु बर्‍याचदा चालक, वाहक बसमध्ये क्षमतेपेक्षा कमी प्रवासी असतानाही मार्गातील नियोजीत थांब्यावर थांबत नाहीत. सर्वीस रोडने जाऊन प्रवासी चढउतार न करता उडडाण पुलावरुन बस नेतात. प्रवाशांना नियोजित ठिकाणी न उतरवता उडडाण पुलाच्या मागे – पुढे उतरण्यास भाग पाडतात.

राज्यातील एसटीच्या प्रत्येक विभागात आणि तालुक्यात किमान 2 ते 3 थांबे आहेत, जेथे चालक-वाहक थांब्यांवर प्रवासी चढउतार न करता परस्पर बस मार्गस्थ करतात. यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊन महामंडळाचे आर्थिक नुकसान होते. याबाबत महामंडळाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याची गंभीर दखल महामंडळाने घेतली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळ प्रवासी मित्र ही योजना राबवित आहे.

Back to top button