Latest

राष्ट्रपती निवडणूक : द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेचा पाठिंबा जवळपास निश्चित?; संजय राऊतांनी दिले संकेत

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा द्यावा अशी मागणी शिवसेनेच्या खासदारांनी उद्धव ठाकरेंना एका पत्राद्वारे केली होती. यावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नुकतीच एक बैठक पार पडली. यामध्ये लोकभावना काय आहे हे समजून घेऊन राष्ट्रपती निवडणुकीतील उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेऊ असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. यावरून शिवसेना खासदारांच्या मागणीला प्रतिसाद देत, राष्ट्रपती निवडणुकीतील एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मुंना पाठिंबा देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

राष्ट्रपती निवडणुकीविषयी बोलताना खा. राऊत म्हणाले, यापूर्वी शिवसेनेने विरोधकांच्या उमेदवारांनाही पाठिंबा दिला आहे. युतीत असताना शिवसेनेने काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिला असल्याची आठवण खा. राऊत यांनी करून दिली. पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीवर चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये प्रत्येकाचे मत समजून घेतले जाईल. शिवसैनिक पक्षप्रमुखांचा आदेश पाळतात, असेही ते म्हणाले.

दरम्यान, भाजपच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्या आणि भविष्यात भारतीय जनता पक्ष आणि बंडखोर नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घ्या, असा एकमुखी सल्‍ला शिवसेनेच्या खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिल्याचे वृत्त आहे.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसंदर्भात भूमिका ठरवण्यापूर्वी उद्धव यांनी 'मातोश्री'वर सोमवारी सेनेच्या खासदारांची बैठक घेतली. शिवसेनेचे लोकसभेत 19 व राज्यसभेत 3 खासदार आहेत. या बैठकीला 13 खासदार उपस्थित होते. मुख्य प्रतोदपदावरून हटवलेल्या खा. भावना गवळी, मुख्यमंत्री शिंदे यांचे चिरंजीव खा. श्रीकांत शिंदे, पालघरचे खासदार व शिंदे समर्थक राजेंद्र गावित, खा. राहुल शेवाळे यांच्यासह 7 खासदार गैरहजर होते. पैकी खासदार संजय जाधव हे आजारी असून, हेमंत पाटील यांच्या मतदारसंघात पूरस्थिती आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT